नायर रुग्णालयातील ३१ कर्मचारी निलंबित!
By Admin | Updated: December 25, 2014 02:17 IST2014-12-25T02:17:01+5:302014-12-25T02:17:01+5:30
नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी महालक्ष्मी येथे एक वसाहत आहे. ही वसाहत धोकादायक असल्यामुळे घरे सोडण्याची नोटीस

नायर रुग्णालयातील ३१ कर्मचारी निलंबित!
मुंबई : नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी महालक्ष्मी येथे एक वसाहत आहे. ही वसाहत धोकादायक असल्यामुळे घरे सोडण्याची नोटीस येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. पण कर्मचाऱ्यांनी घरे न सोडल्यामुळे या वसाहतीत राहणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांना महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी निलंबित केले. यापैकी ३ जणांनी आधीच घरे सोडली असली तरी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महालक्ष्मी येथे नायर रुग्णालयातील ३१ कर्मचारी वसाहतीमध्ये राहतात. २४ आॅक्टोबर रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि २७ आॅक्टोबर रोजी आयुक्तांबरोबर बैठक झाली. यानंतर ही वसाहत धोकादायक असल्यामुळे घरे सोडा, असे या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. पण या कर्मचाऱ्यांना पर्यायी जागा द्या, असे युनियनतर्फे सांगण्यात आले. यानंतर या कर्मचाऱ्यांना सायन येथे १५ आणि गोरेगाव, अंधेरी येथे पर्यायी जागा दिल्या. पण सायन येथील घरांमध्ये पाणी, लाइटची सोय नाही. यामुळे येथे राहायला जाणे शक्य नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरीही कोणत्याही गोष्टी लक्षात न घेता ३१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले. ३१ कर्मचाऱ्यांपैकी १ जण समयलेखक, १ फार्मासिस्ट असून इतर चतुर्थश्रेणी कामगार आहेत. मंगळवारी १० जणांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर बुधवारी अजून २१ जणांवर निलंबनाची कारवाई केली.
२६ डिसेंबर रोजी आयुक्तांबरोबर एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निलंबिन मागे घेण्याची चर्चा केली जाणार आहे. त्यांना घराची सोय व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संचालिका सुहासिनी नागदा यांनी आश्वासन दिल्याचे नारकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)