नव्या जिल्ह्यासाठी ३०२० पोलीस
By Admin | Updated: August 2, 2014 02:58 IST2014-08-02T02:58:47+5:302014-08-02T02:58:47+5:30
क्रवारपासून अस्तित्वात आलेल्या सागरी अन् डोंगरी सौंदर्याने नटलेल्या नव्या पालघर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अपर पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक,

नव्या जिल्ह्यासाठी ३०२० पोलीस
नारायण जाधव, ठाणे
शुक्रवारपासून अस्तित्वात आलेल्या सागरी अन् डोंगरी सौंदर्याने नटलेल्या नव्या पालघर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अपर पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक, २२ निरीक्षक, ४८ सहायक निरीक्षक, १२१ उपनिरीक्षक, २२६ उपनिरीक्षक, ४२७ हेड कॉन्स्टेबल, ६१५ पोलीस नाईक, १३८४ शिपायांसह सुमारे ३०२० कर्मचाऱ्यांचा स्टाफ दिमतीला देण्यात आला आहे़
जिल्ह्याच्या सुमारे ५७६६ चौ. किमी क्षेत्रातील तीन नगरपालिका अन् एका महापालिकेसह ९५६ गावांत राहणाऱ्या १४ लाख ३५ हजार १७८ इतक्या लोकसंख्येच्या संरक्षणाची जबाबदारी हे ३०२० कर्मचारी २२ पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सांभाळणार आहेत़ मुंबईवरील २६/११च्या अतिरेकी हल्ला करणारे अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गेच आल्याने पालघर जिल्ह्याचा समुद्रकिनारा अतिसंवेदनशील मानला जातो़
नव्या जिल्ह्याचा बहुतांश भाग सागरी असल्याने समुद्रकिनारी गस्तीसाठी ७ बोटींसह विविध १७५ वाहने, ३०४ बिनतारी संदेश यंत्रणा, ५९२ एसएलआर रायफल, ९ एके ४७ मशिनगन, ९३ कार्बाइन, १९७ पिस्तूल (९ एमएम), ५ गॅस गनसह १०८४ हत्यारे आणि या हत्यारांसाठी लागणारी सुमारे १,२६,६६१ इतकी काडतुसे व तत्सम दारूगोळा या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे़
राज्य मंत्रिमंडळाने आपल्या १३ जून २०१४ रोजी झालेल्या बैठकीत नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर त्यातील पालघर, वसई, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि तलासरी या आठ तालुक्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पोलीस कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी ठाणे पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त कर्मचारी/अधिकारी, वाहने, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वर्ग करण्यास राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ९ जुलै २०१४ रोजी मान्यता दिली होती़ त्यानुसार गृह विभागाने यासंदर्भात ३० जुलै २०१४ रोजी तातडीचा आदेश काढून आज १ आॅगस्टपासून अस्तित्वात येणाऱ्या पालघर जिल्ह्यासाठी हा कर्मचारीवर्ग करण्याचे आदेश काढले़
जुन्या ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीतील ४७०० कर्मचारी/अधिकाऱ्यांमधूनच हा स्टाफ देण्यात आला आहे़ यामुळे आता त्यांच्याकडे १७८० इतक्या स्टाफसह १५ पोलीस ठाणीच राहणार आहेत़