जिल्ह्यातील ३०० पंप बंद राहणार
By Admin | Updated: August 25, 2014 01:17 IST2014-08-25T01:17:32+5:302014-08-25T01:17:32+5:30
पेट्रोल वरील स्थानिक कर कमी करून, राज्यातील किमती एकसमान करण्याच्या मागणीसाठी पेट्रोल पंप २६ आॅगस्टपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स

जिल्ह्यातील ३०० पंप बंद राहणार
कर कपातीची मागणी : २६ पासून राज्यव्यापी बंद
नागपूर : पेट्रोल वरील स्थानिक कर कमी करून, राज्यातील किमती एकसमान करण्याच्या मागणीसाठी पेट्रोल पंप २६ आॅगस्टपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. बंदच्या समर्थनार्थ नागपूर जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त पंप बंद राहतील, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी लोकमतला दिली.
एलबीटी दर कमी केल्यास, राज्य विशिष्ट अधिभाराचा (एसएससी) निर्णय होईपर्यंत व्हॅटचा दर कमी केल्यास पेट्रोल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त होईल. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणूनही सरकारकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे २६ आॅगस्टपासून बेमुदत बंदचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ११ आॅगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. मात्र त्यानंतरही सरकारने ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळेच बंदचा निर्णय घेतल्याचे भाटिया यांनी यांनी स्पष्ट केले. एका प्रश्नाच्या उत्तरात भाटिया यांनी सांगितले की, सरकारकडून चर्चेसाठी अद्याप बोलावणे न आल्याने संप अटळ आहे.
पेट्रोल आणि डिझेल करमुक्त करणे, संपूर्ण राज्यात एक कर आणि एकच किंमत ठेवणे तसेच अतिरिक्त कर कमी करण्याची पंपचालकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोलचा अतिरिक्त भरणा नको
बंदच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी पेट्रोल व डिझेलचा अतिरिक्त साठा किंवा गाड्यांमध्ये भरणा करू नये. बंद ग्राहकांच्या फायद्यासाठी असून त्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन भाटिया यांनी केले.