मातीच्या धरणात ३0 टक्केच पाणी
By Admin | Updated: January 16, 2017 01:04 IST2017-01-16T01:04:17+5:302017-01-16T01:04:17+5:30
वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे.

मातीच्या धरणात ३0 टक्केच पाणी
दावडी : वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे. एक महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक असून उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी असल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे.
वाफगाव येथे वेळ नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे मातीचे धरण आहे. वाफगाव, वरुडे, पारगाव, गुळाणी या परिसराला धरणातील पाणी वरदान ठरले आहे. रब्बी हंगामात येथील शेतकरी कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. आॅगस्ट महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहात होते. वरुडे व वाफगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी धरणाच्या चारीवाटे पाणी सोडण्यात आले. तसेच धरणातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जानेवारी महिन्यातच धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असाच पाणी उपसा सुरु राहिल्यास महिन्याभरात या धरणात पाण्याचा थेंबही राहणार नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वाफगाव परिसरात पिण्याच्या पाण्यचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. (वार्ताहर)
>गेल्या पाच वर्षांत प्रथमच जानेवारी महिन्यातच धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येणार नाहीत. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार आहेत उन्हाळ्याचे चार महिने कसे काढायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मासेमारी करणारा आदिवासी नागरिक हतबल झाला आहे.