३ हजार कोटींच्या विहिरी
By Admin | Updated: July 18, 2014 01:02 IST2014-07-18T01:02:50+5:302014-07-18T01:02:50+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन

३ हजार कोटींच्या विहिरी
मनरेगा : विदर्भात ३५ टक्के कामे
नागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन हजार कोटींची कामे होणार आहेत.
एक लाख विहिरींपैकी ३० हजार विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ७० हजार विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत, असे रोहोयो मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
मनरेगाच्या नवीन आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी पुण्यातील १६ मुख्यालये नागपुरात सुरू करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले. वन , खाण आणि इतर काही मुख्यालयांचा अपवाद सोडला तर बरीचशी कार्यालये अद्याप येथे आली नाहीत. रोहयो खात्याचा मंत्री झाल्यानंतर मनरेगाचे मुख्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव जेव्हा पुढे आला तेंव्हाही पुण्याचेच नाव होते. मात्र ते विदर्भात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश आले. विदर्भात सध्या मनरेगाची ३५ टक्के कामे सुरू आहेत. मुख्यालय नागपूरमध्ये सुरू करण्याचा हा फायदा आहे.
तीन वर्षापूर्वी या योजनेचे बजेट ३४० कोटी रुपये होते आता ते २ हजार कोटींवर गेले आहे. मनरेगाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळाच्या काळातही मागेल त्याला काम देण्याची शासनाची तयारी आहे. यावर्षासाठी १२०० कोटींच्या कामांचे उदिष्ट निश्चित करण्यात आले असून पुढच्या वर्षासाठी १५०० कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. २८ हजार ग्रामपंचायतीत रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे, असे राऊत म्हणाले. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उपग्रह प्रणालीवर आधारित यंत्रणा वापरण्यात येत आहे. मजुरांना लवकरात लवकर मजुरी मिळावी यासाठी नवीन यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.
राज्यस्तरीय कार्यशाळा
दरम्यान दुपारी राज्यभरातून आलेले ग्रामरोजगार सेवक आणि इतर अधिकाऱ्यांची देशपांडे सभागृहात कार्यशाळा झाली. यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्राम रोजगार सेवक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले.
नरेगाची कामे विखुरलेली असल्याने ती दिसत नाही मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या कामातून गुंतवणूक झाली आहे, असे प्रधान सचिव व्ही.गिरीराज म्हणाले. (प्रतिनिधी)
नवीन आयुक्तालय चकाचक
मनरेगा नवीन आयुक्तालयाची रचना एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या कार्यालयाप्रमाणे करण्यात आली आहे. प्रशासकीय भवनाच्या (क्रं २) पहिल्या माळ्यावर असलेल्या या कार्यालयाचे उद््घाटन गुरुवारी रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रधान सचिव व्ही गिरीराज,कार्यशाळेला विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन, नासुप्रचे सभापती डॉ. प्रवीण दराडे, रोहोयोच्या उपसचिव आर. विमला यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यालयाच्या रचनेवर एकूण दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सध्या विभागीय आयुक्त कार्यालयात हे आयुक्तालयाचे कामकाज सुरू होते.