शहापुरात सिकलसेल आजाराचे २८ रुग्ण
By Admin | Updated: December 26, 2014 02:40 IST2014-12-26T02:40:04+5:302014-12-26T02:40:04+5:30
शरीरातील तांबड्या पेशींशी निगडित असणाऱ्या सिकलसेल अॅनिमिया या आजाराचे पीडित (ग्रस्त) २८ रुग्ण शहापूर तालुक्यात आढळून आले आहेत.

शहापुरात सिकलसेल आजाराचे २८ रुग्ण
डोळखांब : शरीरातील तांबड्या पेशींशी निगडित असणाऱ्या सिकलसेल अॅनिमिया या आजाराचे पीडित (ग्रस्त) २८ रुग्ण शहापूर तालुक्यात आढळून आले आहेत. पाच वर्षांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत सुरू असलेल्या कार्यक्रमातून ही आकडेवारी समोर आली आहे. या आजारामध्ये वाहक व पीडित (ग्रस्त) असे दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. वाहक रुग्णास तुरळक प्रमाणात त्रास होतो आणि तो सामान्य व्यक्तीचे जीवन जगत असतो.
यापूर्वी या आजाराची प्राथमिक तपासणी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात होत असे. मात्र, या ठिकाणी असलेली सोल्युबिलिटी यंत्रणा दोन वर्षांपासून ठप्प असल्याने रक्त तपासणीकरिता जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे आरोग्य स्वयंसेवकांना जावे लागत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखांब, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, कसारा, अघई, वासिंद, शेंद्रुण या ठिकाणी २८ पीडित (ग्रस्त), तर ३७२ वाहक रुग्ण आहेत. शहापूर तालुक्यात ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर सिकलसेल आजार तपासणी सप्ताहादरम्यान ३५८२ व्यक्तींची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून ४७ व्यक्तींचे रक्त नमुने शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सोल्युबिलिटी तपासणी यंत्रणा बंद असल्याने जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. येथील २८ रुग्णांपैकी ४ रुग्णांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला ६०० रु. आर्थिक मदत मिळते. मात्र, इतर रुग्णांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ही मदत मिळत नाही. (वार्ताहर)