२६ किलो एमडीसाठी काळोखेची चौकशी
By Admin | Updated: June 4, 2015 04:28 IST2015-06-04T04:28:50+5:302015-06-04T04:28:50+5:30
ड्रग माफीया शशिकला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला २६ किलो एमडीचा हिशोब हवा आहे. त्यासाठी कोल्हापूर कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ

२६ किलो एमडीसाठी काळोखेची चौकशी
मुंबई : ड्रग माफीया शशिकला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला २६ किलो एमडीचा हिशोब हवा आहे. त्यासाठी कोल्हापूर कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेकडे गुन्हे शाखा चौकशी करणार आहे.
बेबी आणि पाच आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर अनेक नवे मुददे समोर आले आहेत. त्यासाठी काळोखेकडे चौकशी करणे आवश्यक होते. त्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. न्यायालयाने ती मंजूर केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. काळोखेकडून सातारा पोलिसांनी ११४ तर मुंबई पोलिसांनी १२ किलो एमडी हस्तगत केले होते. हे एमडी बेबीनेच सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते, असा दावा काळोखेने केला होता. अटकेनंतर झालेल्या चौकशीत बेबीने दिडशे किलो एमडीचा साठा काळोखेकडे दिल्याचा दावा केला होता. त्यामुळे २६ किलो एमडी गेले कुठे असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे. हा साठा अन्य तस्करांच्या हाती लागल्यास तो नशा करणाऱ्यांच्या हाती पडेल, या भीतीने तो हस्तगत करण्याच्या उददेशाने गुन्हे शाखा काळोखेकडे चौकशी करणार आहे. अटकेपुर्वी काळोखेनेच २६ किलो एमडी अन्य तस्करांना विकले असावे, असाही संशय गुन्हे शाखेला आहे. अनेक वर्षे काळोखे बेबीच्या धंद्यात सहभागी होता. मात्र काळोखे परस्पर एमडी विकत असल्याची कुणकूण बेबीला लागली आणि त्यांच्यात वाद झाला. यातूनच तिने काळोखेची माहिती सातारा पोलिसांना देऊन त्याला अडकवले असावे, असाही अंदाज व्यक्त होत आहे.