२५०० मेगावॅट वीजनिर्मिती

By Admin | Updated: July 21, 2015 01:24 IST2015-07-21T01:24:31+5:302015-07-21T01:24:31+5:30

कोराडी, चंद्रपूर आणि परळी या तीन ठिकाणचे काम पूर्ण होत आले

2500 MW Power Generation | २५०० मेगावॅट वीजनिर्मिती

२५०० मेगावॅट वीजनिर्मिती

मुंबई : कोराडी, चंद्रपूर आणि परळी या तीन ठिकाणचे काम पूर्ण होत आले असून, राज्याला लवकरच २५०० मेगावॅट वीज मिळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. महानिर्मितीच्या कोणत्याही वीज संचामुळे वीजनिर्मिती मंदावली नसल्याचेही ते म्हणाले. शिवाय, दाभोळ प्रकल्प बंद असला तरी तो सुरू केला जाईल आणि त्यातून मिळणारी वीज रेल्वेला सेंट्रल ग्रीडसाठी देण्याविषयी विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
वीजनिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महानिर्मितीच्या वीजसंचाची मुदत संपल्याने होणारी वीजनिर्मिती मंदावली असल्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. आमदार बसवराज पाटील, दिलीप वळसे-पाटील, संजय सावकारे, जयदत्त क्षीरसागर यांनी यावर प्रश्न विचारले. बावनकुळे म्हणाले, महानिर्मिती कंपनीच्या १७ संचांचे आयुष्य २५ वर्षांपेक्षा जास्त व ११ संचांचे आयुष्य ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. चंद्रपूर केंद्रातील काही संचांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे एप्रिल २०१५मध्ये ते संच बंद होते. मात्र या संचांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ११व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महानिर्मिती कंपनीच्या २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या संचांचे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने कोराडी संच क्रमांक ६च्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पडताळणी केली जाईल व नंतर इतर संचांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 2500 MW Power Generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.