गडचिरोलीतील बीनागोंडात २५ वर्षांनी फडकला तिरंगा
By Admin | Updated: January 29, 2015 10:26 IST2015-01-29T10:09:27+5:302015-01-29T10:26:46+5:30
महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमेवरील बीनागोंडा गावात नक्षलवाद्यांची झुगारुन तब्बल २५ वर्षांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.

गडचिरोलीतील बीनागोंडात २५ वर्षांनी फडकला तिरंगा
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २९ - महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमेवरील बीनाबोंडा गावात नक्षलवाद्यांची झुगारुन तब्बल २५ वर्षांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या या धाडसी पावलाला ग्रामस्थांनी साथ देत या ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील बीनागोंडा हे गाव म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. घनदाट जंगलात वसलेले हे गाव म्हणजे नो मेन्स लँड. नक्षलवाद्यांचा या गावात नेहमीच वावर असल्याने गावात नक्षलवाद्यांची दहशत असते. नक्षलवादी दहशतीच्या आधारे स्वातंत्र्य, प्रजासत्ताक हे सर्व खोटे असल्याचे स्थानिकांना सांगायचे. गेल्या २५ वर्षांत या गावात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला नाही. मात्र पोलिस आणि नक्षलवादविरोधी पथकाने यंदा अत्यंत नियोजनपूर्वक या भागात ध्वजारोहणाचा कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली. ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले. याचे फळ म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बीनागोंडातील आश्रमशाळेत पार पडलेला ध्वजारोहण सोहळा. आश्रमशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त अशा वातावरणात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.