नापिकीला कंटाळलेल्या 25 वर्षाच्या शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 17, 2017 13:08 IST2017-04-17T13:02:57+5:302017-04-17T13:08:43+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

नापिकीला कंटाळलेल्या 25 वर्षाच्या शेतक-याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबवण्याचं काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतोच आहे. नाशिकमध्येही अवघ्या 25 वर्षांच्या तरुण शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. शेततळ्याच्या पाण्यातच उडी घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. मालेगाव तालुक्यातील वाके गावातील ही घटना आहे.
लातूरमध्ये शेतकरी कन्येची आत्महत्या
लातूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका शेतकरीच्या मुलीने आत्महत्या केली. दोन मुलींचे गेटकेन लग्न केल्यानंतर तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे असा प्रश्न तिच्या वडिलांपुढे होता. 21 वर्षांच्या शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या करुन शेतकरी वडिलांवरील लग्नाचा भार कमी केली.
विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या शीतलने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता. लातूर) येथे घडली. शीतलचे वडील व्यंकट वायाळ यांची साडेपाच एकर शेती असून कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे. त्यांचा मोठा मुलगा लातुरात तर लहान मुलगा गावातील शाळेत शिक्षण घेत आहे.
शेतीसाठी त्यांनी जिल्हा बँक, सहकारी संस्था व कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडून कर्ज काढले होते़ परंतु, शेतीतून काहीही उत्पन्न न निघाल्याने ते चिंताग्रस्त होते़ पैशाअभावी दोन वर्षांपासून शीतल हिचा थांबला होता. यातूनच तिने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून मी स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
रुढी-परंपरा कमी करण्यासाठी आत्महत्या
शेतातील सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक आहे़ माझ्या दोन बहिणींचे लग्न गेटकेन (अत्यंत साधेपणाने) करण्यात आले़ परंतु, माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून वडिलांचे दारिद्र्य संपत नव्हते. कुठलीही बँक, सावकाराकडून कर्ज न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून थांबले होते. वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी व समाजातील रुढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करीत आहे़ मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये, असे शीतलने म्हटले आहे.