सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!
By Admin | Updated: September 5, 2016 04:38 IST2016-09-05T04:38:29+5:302016-09-05T04:38:29+5:30
वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!
ठाणे : वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली; पण ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मागील दीड वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या अहवालावरून उघड झाले आहे.
पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर पाचवी ते सातवीसाठी एक हजार ५०० रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. मात्र, मागील सुमारे दीड वर्षापासून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३० विद्यार्थ्यांसह शहापूर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचेदेखील लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे.
दररोज नवीननवीन आश्वासने, योजना जाहीर करत आदिवासींचा पुळका असल्याचे सरकार जाहिरातींद्वारे करीत असल्याचा आरोपही तुळपुळे यांनी केला असून आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना लेखी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या सर्व योजना अंमलबजावणीअभावी कागदावर शोभेच्या बनून राहिल्या आहेत, असा खेद व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा सचिवांकडून केली आहे. (प्रतिनिधी)