२५ गावांचा महसूल कारभार ठप्प

By Admin | Updated: October 20, 2016 03:11 IST2016-10-20T03:11:59+5:302016-10-20T03:11:59+5:30

महाड तालुक्यात ३६ सजांची सहा विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

25 Revenue Revenue Revenue | २५ गावांचा महसूल कारभार ठप्प

२५ गावांचा महसूल कारभार ठप्प

सिकंदर अनवारे,

दासगाव- महाड तालुक्यात ३६ सजांची सहा विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या विभागासाठी सहा मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक असून प्रत्येक मंडल अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात सहा तलाठी काम करत आहेत. प्रत्येक विभागामध्ये २५ ते ३० गावांचा समावेश आहे. गेल्या महिनाभरापासून तीन मंडल अधिकारी संपूर्ण महाड तालुका सांभाळत होते. त्यामधून २० दिवसांपूर्वी महाड महसूल विभागातील एक मंडल अधिकारी अचानक रजेवर गेल्याने सध्या दोनच मंडल अधिकारी कामकाज पाहत आहेत. महाड महसूल विभागातील ६ तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रात या विभागातील २५ गावांची महसुली कामे ठप्प झाली आहेत.
महाड महसूल प्रशासनाने नवीन मंडल अधिकाऱ्यांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. मात्र अद्याप जिल्हा प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. महाडमध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात तलाठ्यांची कमतरता होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून रिक्त पदे भरल्यामुळे ही समस्या दूर झाली. सध्या महाड तालुक्यामध्ये मंडल अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महाड तालुक्यामध्ये ३६ तलाठी सजा आहेत. महाड विभाग, नाते, तुडील, करंजाडी, बिरवाडी, खरवली अशा सहा महसुली विभागामध्ये ३६ सजांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागामध्ये सहा तलाठ्यांवर एक मंडल अधिकाऱ्याची नेमणूक आहे. सहा विभागासाठी सहा मंडल अधिकाऱ्यांची गरज असताना तुडील मंडल अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. त्याठिकाणी करंजाडीचे मंडल अधिकारी बी. एम. जाधव हे तात्पुरते काम पाहत होते. महिनाभरापूर्वी बिरवाडी विभागातील मंडल अधिकारी पी. एच. भोईर व करंजाडीचे मंडल अधिकारी बी. एम. जाधव यांना लाचलुचपत खात्याने नागरिकांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे हे दोन्ही मंडल अधिकारी सध्या निलंबित आहेत.
या घटनेनंतर महाड तालुक्याचा सर्व कार्यभार तीन मंडल अधिकाऱ्यांवर येवून पडला आहे. यामुळे महाड महसूल प्रशासनाकडून कार्यालयातील अव्वल लिपिक आर. बी. भादिकर व डी. एन. पाटील यांना करंजाडी व तुडील विभाग कार्यालयातील कामे सांभाळून या ठिकाणी मंडल अधिकाऱ्यांची कामे तात्पुरती सांभाळण्याचे आदेश दिले.त्यानंतर शिल्लक मंडल अधिकाऱ्यांपैकी महाड महसूल विभागाचे मंडल अधिकारी एस. पी. भुजबळ हे २० दिवसांपूर्वी अचानक रजेवर गेले. यामुळे महाड महसूल विभागातील असलेल्या दाभोळ, दासगांव, केंबुर्ली, महाड, गोंडाळे, कांबळे तर्फे बिरवाडी अशा सहा तलाठी सजातील महाड, नडगाव, चांभार खिंड, कांबळे तर्फे बिरवाडी, शेळ, भोगाव साकुडी, कुसगाव, टेमघर, दासगाव, आडी, वीर, डोंगरोली, केंबुर्ले, वहूर, गांधारपाले, मोहप्रे, दाभोळ, गोविले, सापे तर्फे गोविले, टोल बु., लाडवली, काचले, तेटधर अशा पंचवीस गावांना गेली २० दिवसांपासून तलाठी असले तरी मंडल अधिकारीच नाहीत. यामुळे या गावातील नागरिकांची अनेक कामे, फेरफार नोंदी मंजूर करणे, ऐपतीचा दाखला, बिनशेती प्रकरण व इतर शाळांसाठी व नोकरी धंद्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले ज्यांच्यावर मंडल अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय काही होत नाही, अशी अनेक प्रकरणे या महाड महसूल विभागातील सहा तलाठी कार्यालयामध्ये पडून आहेत. महसूल प्रशासनाकडून या विभागाची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.
>नागरिकांच्या फेऱ्या
महाड, नडगाव, चांभार खिंड, कांबळे तर्फे बिरवाडी, शेळ, भोगाव साकुडी, कुसगाव, टेमघर, दासगाव, आडी, वीर, डोंगरोली, केंबुर्ले, वहूर, गांधारपाले, मोहप्रे, दाभोळ, गोविले, सापे तर्फे गोविले, टोल बु., लाडवली, काचले, तेटधर अशा पंचवीस गावांचा महसुली कारभार मंडल अधिकारी नसल्याने ठप्प झाला आहे.
गावचे नागरिक दरदिवशी आपल्या कामांसाठी तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. ज्या पद्धतीत महाड महसूल प्रशासनाने अव्वल लिपिक दुसऱ्या विभागात दिले त्याप्रमाणे या विभागाचा विचार न केल्याने येथील नागरिकांमध्ये महसूल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
>ज्या मंडल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी नवीन मंडल अधिकारी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आलेली आहे. महाड महसूल विभागाचे मंडल अधिकारी रजेवर आहेत. त्या ठिकाणची नागरिकांची अडचण लवकर दूर करण्यात येईल.
- औदुंबर पाटील,
तहसीलदार, महाड

Web Title: 25 Revenue Revenue Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.