पानसरेंच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी!
By Admin | Updated: March 23, 2015 01:20 IST2015-03-23T01:20:54+5:302015-03-23T01:20:54+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली होती.

पानसरेंच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी!
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली होती. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून तो कर्नाटकात लपल्याची धक्कादायक माहिती मिरज येथील एका फासेपारधी दाम्पत्याने पोलिसांना रविवारी दिली. त्यानुसार या दाम्पत्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे पथक दिवसभर माहिती घेत होते, असे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.
फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासातील साम्य जुळत असल्याने पोलिसांची काही विशेष पथके रात्रीच कर्नाटकात रवाना झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मिरजेतील फासेपारधी दाम्पत्याला पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून समजले. त्यांनी तातडीने या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली. माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधितांना मिरज पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी कोल्हापुरात घेऊन आले. पोलीस मुख्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मारेकरी कर्नाटकात लपला असून तो आम्हाला २५ हजार रुपये देणार होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)