शार्लेट तलावात २५ फूट पाणी
By Admin | Updated: June 9, 2016 03:25 IST2016-06-09T03:25:11+5:302016-06-09T03:25:11+5:30
थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शार्लेट तलावाची दोन वर्षांपूर्वी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता केली होती.

शार्लेट तलावात २५ फूट पाणी
माथेरान : थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शार्लेट तलावाची दोन वर्षांपूर्वी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता केली होती. त्याचा चांगला परिणाम माथेरानकर यावर्षी अनुभवत आहेत. मे महिन्याच्या मध्यावर आटणारा शार्लेट तलावात जून महिना सुरु झाल्यानंतर देखील २५ फूट पाणी आहे. माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी शार्लेटमधील पाणी उपयुक्त ठरत आहे.
माथेरानमध्ये ब्रिटिशांनी शार्लेट तलाव खोदला असून १५ एकर जागेत असलेल्या या तलावात यावर्षी आजच्या तारखेला २५ फूट पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षे परिसरातील गाळ आणि दगड तलावात येऊन पडल्याने पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम झाला होता. सध्या माथेरानमध्ये नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू आहे, मात्र मागील काही वर्षे मे महिन्याच्या मध्यावर शार्लेट तलाव तळ गाठायचा. त्यामुळे मे महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन हंगामात पाण्याची टंचाई निर्माण होत होती. २०१४ मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने २००० श्रीसदस्यांच्या माध्यमातून शार्लेट तलावातून गाळ बाहेर काढला होता. त्यांच्या श्रमदानाने कौतुक अनेकांनी केले होते.
श्रीसदस्यांनी केलेल्या श्रमदानाचा परिणाम आता दिसून येत आहे. (वार्ताहर)
श्रीसदस्यांच्या श्रमदानाचा परिणाम : श्रीसदस्यांनी केलेल्या श्रमदानाचा परिणाम आता दिसून येत आहे. मे महिन्यात तळ गाठणारा तलाव आज जून महिना सुरू झाला तरी पाण्याचे अस्तित्व दाखवत आहे. तलावात जून महिन्यात २५ फुटापर्यंत पाणीसाठा असल्याचे दिसून येत असल्याने माथेरानकरांना हायसे वाटत आहे. अनेक वर्षांनंतर शार्लेट तलावामध्ये जून महिन्यात पाणीसाठा दिसत असल्याने माथेरानकर समाधानी आहेत.