२४ तास पोस्टमॉर्टेमला ‘ना’
By Admin | Updated: July 13, 2014 01:05 IST2014-07-13T01:05:34+5:302014-07-13T01:05:34+5:30
सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने

२४ तास पोस्टमॉर्टेमला ‘ना’
मेडिकलचे न्यायवैद्यकशास्त्र विभाग : अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याची दिली कारणे
सुमेध वाघमारे - नागपूर
सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात सांगितले. परंतु राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने (फॉरेन्सिक मेडिसीन) याला विरोध दर्शविला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारणे देऊन रात्रीचे पोस्टमॉर्टेम बंदच ठेवले आहे. पूर्वीच्या काळी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना विनाकारण या कायद्यामुळे त्रास होत होता. हा त्रास कमी व्हावा या उद्देशाने आव्हाड यांनी विधिमंडळात २४ ही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील सूचना राज्यातील सर्वच मेडिकल रुग्णालयांना पाठविण्यातही आल्या. परंतु रात्रीच्या वेळी हे गृह बंदच राहत असल्याची माहिती आहे.
या विभागातील तज्ज्ञांच्या मते तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. तसे वैद्यकीय पुस्तकातही नमूद आहे. रुग्णालयाच्या नियमांमध्येही त्याची नोंद आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्या बाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. दुसरीकडे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच पोस्टमॉर्टेम करून देण्याचा आग्रह ठेवतात. यासाठी ते इतरांपर्यंत मृत्यूचा निरोप पोहचविण्याची आणि अंत्ययात्रेची तयारी करण्याची कारण देतात. यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, अपुरे मनुष्यबळ. यामुळे २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवणे अशक्यच आहे. एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्ट आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु अनेक मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे.
ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्ट आणि तंत्रज्ञांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक मेडिकलच्या या विभागात दोन किंवा तीनपेक्षा जास्त यांची संख्या नाही. मंत्र्यांनी मनुष्यबळ दिल्यास आणि शवविच्छेदनगृहात व्यापक सोय करून दिल्यानंतरच हे शक्य आहे. मात्र, याचा विशेष असा फायदा होणार नाही हेही तेवढेच खरे आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दहा वर्षांपूर्वीही घेतलेला निर्णय मागे घेतला
दहा वर्षांपूर्वीही २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याच्या निर्णय झाला होता. त्यावेळी न्यायवैद्यक प्रकरणे हाताळणाऱ्या समितीने याला विरोध दर्शवून विविध कारण देऊन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. याशिवाय २०१०-११च्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही एका आमदाराने याची मागणी केली होती. परंतु नंतर ही मागणी मागे घेतल्याची माहिती आहे.