२४ कारखान्यांची धुराडी पेटली
By Admin | Updated: November 5, 2014 04:23 IST2014-11-05T04:23:47+5:302014-11-05T04:23:47+5:30
राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप

२४ कारखान्यांची धुराडी पेटली
कोल्हापूर : राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज असले तरी ऊस दराची कोंडी अजून फुटली नसल्याने यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. साधारणत: १० नोव्हेंबरनंतर येथील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम गती घेण्याची शक्यता असून, कागल तालुक्यातील शाहू सहकारी कारखाना ७ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत २७०० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे. साखर कारखान्यांचा उतारा व त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपीची रक्कम पाहिली तर या मागणीच्या जवळपासच आहे. सध्या बाजारपेठेतील साखरेचे दर व राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना देऊ केलेली उचल पाहता एकरकमी एफआरपी देताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. दरवर्षी ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलनाचे रणशिंग फुंकते पण यावर्षी तात्पुरते का असेना आंदोलनाचे हत्यार म्यान करून चर्चेसाठी वेळ दिलेली आहे. पण हे करत असताना त्यांनी कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना मदतीबाबत तोंडही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत कारखाने सुरू केले आणि एफआरपीप्रमाणे दर दिला नाही तर कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती कारखानदारांना आहे. त्यामुळे विशेषत: कोल्हापूर विभागातील कारखानदारांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)