पालघरमधील २३ आॅक्टोबरच्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी
By Admin | Updated: October 20, 2016 03:34 IST2016-10-20T03:34:09+5:302016-10-20T03:34:09+5:30
पालघर जिल्ह्यात मराठा तरुण, तरुणी, आबालवृद्ध, छोटी मंडळी २३ आॅक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील मराठा मूक मोर्चाच्या तयारीला लागला आहे.

पालघरमधील २३ आॅक्टोबरच्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी
पालघर : आपल्या घरात एखादे शुभकार्य ठरावे आणि त्या कार्यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकदिलाने जुंपावे, अगदी तशीच काहीसे वातावरण पालघर जिल्ह्यात मराठा तरुण, तरुणी, आबालवृद्ध, छोटी मंडळी २३ आॅक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील मराठा मूक मोर्चाच्या तयारीला लागला आहे. हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा व्हावा, यासाठी सर्व जण जीव ओतून काम करीत आहेत. या मोर्चामुळे थोडासाही त्रास प्रशासनासह अन्य कुणाला होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील प्रकरणात पूर्ण न्याय मिळावा आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावे, ही त्रिसूत्री घेऊन ‘एक मराठा लाख मराठा’ हा मूक मोर्चा संपूर्ण राज्यभर रेकॉर्ड ब्रेक गर्दीने ओसंडून वाहत आहे. अनेक जाती धर्माची जोखडे तोडून या मूक मोर्चात अनेकांनी सहभागी होत आपला पाठिंबा दर्शवित आहेत. २३ आॅक्टोबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून गुजरात राज्यासह, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून प्रचंड जनसमुदाय एकत्र येणार आहे. या मोर्चाच्या यशस्वितेसाठी प्रचंड मेहनत घेतली जात असून जिल्हा, तालुका, गाव, विभाग, एवढेच नव्हे तर घराघरात जाऊन माहिती दिली जातं आहे.
प्रचंड संख्येने उपस्थित राहणाऱ्यासाठी टी शर्ट, टोप्या, झेंडे, बिल्ले, फलक आदीच्या छपाईची कामे पूर्ण होऊन त्याच्या विक्रीला ही मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात मोठमोठी होर्डिंग, कमानी उभारण्यात आल्या असून कुठेही सर्वसामान्यांना, वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाहीत याची विशेष काळजीही घेण्यात येणार आहे. हा मोर्चा बोईसर रस्त्यावरील स.तू. कदम शाळेच्या मैदानात जमूननंतर शिवाजी चौक, चार रस्ता-रेल्वे स्टेशन-हुतात्मा स्तंभ-तहसील कार्यालय समोरून आर्यन शाळेच्या मैदानावर एकत्र येणार आहे. या मार्च्यात सहभागी होण्यासाठी गुजरात राज्यातील वापी, उंबरगाव, तलासरी, या भागातील मोर्चेकरांना मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील चिल्हार-बोईसर रस्त्यावरून बोईसर, डहाणू सह एकत्रपणे पालघर मधील स.तू.कदम शाळेजवळील पार्किंगच्या जागेत वाहने ठेवण्यात येणार आहेत.
वसई, नालासोपारा, विरार, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, ई. भागातील मोर्चेकऱ्यांसाठी पालघर पूर्वे कढील सेंट जॉन कॉलेज जवळ पार्किंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हा मूक मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने कुठेही गालबोट लागणार नाही असे वागू नये या बाबत स्वयं सेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जनजागृतीसाठी पथनाट्ये, जलद संपर्कासाठी शंभर वॉकीटॉकी घेतलेले स्वयंसेवक, ड्रोन कॅमेरे, वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांची टीम, रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालयजवळ आणि आर्यन क्र ीडांगणजवळ ठेवण्यात आली आहे. पाणी पिण्याची सुविधा रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय आणि आर्यन क्रीडांगणजवळ ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक नंबर, महत्वाचे फोन नंबर, नैसर्गिक विधी व्यवस्था याचीही व्यवस्था ठेवण्यात आली आहे.