गणेशोत्सवात एसटी सोडणार २२१६ जादा बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:08 IST2017-07-19T15:41:22+5:302017-07-19T16:08:38+5:30
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे.

गणेशोत्सवात एसटी सोडणार २२१६ जादा बसेस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19- गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांसाठी एसटीने तब्बल २२१६ बसेसची सोय केली आहे. तसंच एसटीच्या या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलं आहे.
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २२१६ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या २२ जुलै ( एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच १५ जुलै पासून ग्रुप बुकिंगला सुरूवात झाली असून परतीच्या ग्रुप बुकिंगची सुरुवात २३ जुलै पासून होणार आहे.
२० ते २४ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी "वाहन दुरुस्ती पथक " ( ब्रेक डाउन व्हॅन ) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.