‘लोकमत’मुळे २२ वर्षांची फरफट संपली
By Admin | Updated: July 1, 2015 00:17 IST2015-07-01T00:17:08+5:302015-07-01T00:17:08+5:30
जावळीच्या शेतकऱ्याची कथा : बातमीनंतर १८ दिवसांत शेतात पडले झुळझुळ पाणी...!

‘लोकमत’मुळे २२ वर्षांची फरफट संपली
विश्वास पाटील - कोल्हापूर वार... मंगळवार. वेळ... दुपारी एकची. सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील सदाशिव दिनकर निकम यांच्या लिंगावणा नावाच्या शेतातील विहिरीवर वीजपंप सुरू झाला आणि नळातून पडणारे पांढरे शुभ्र झुळझुळ पाणी पाहून निकम कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून तब्बल २२ वर्षे हेलपाटे मारणाऱ्या निकम यांची फरफट ‘लोकमत’ने १२ जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर ‘महावितरण’ची यंत्रणा हादरली व अवघ्या १८ दिवसांत त्यांना वीज कनेक्शन जोडून दिले. निकम सध्या पंचाहत्तरीकडे झुकलेले व त्यांचा मोठा भाऊ ऐंशीकडे. आम्ही मरण्यापूर्वी शेतात पाणी पडताना पाहण्याचे भाग्य ‘लोकमत’मुळे मिळाल्याची प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली. निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ रोजी वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी मेढा येथे जाऊन १९१० रुपये अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. त्या अर्जाची मुदत संपल्याने त्यांनी १२ आॅक्टोबर २०११ रोजी नवीन अर्ज करून ३०२५ रुपये परत भरले; परंतु तरीही त्यांना कनेक्शन मिळाले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने ही बातमी प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी महावितरणची गाडी त्यांना शोधत घरी गेली व सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निकम यांनी साडेबारा हजार रुपयांचा तीन अश्वशक्तीचा वीजपंप विकत घेतला. वायर, तार, आदी साहित्यासह त्यांना २१ हजार रुपये खर्च आला. त्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कनेक्शन जोडण्यात अडचणी आल्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यावर मंगळवारी दुपारी कनेक्शन जोडले व पंप सुरू होऊन त्यातून निकम यांच्या शेतात पाणी पडले. निव्वळ ६० फुटांसाठी... निकम यांच्या शेताजवळ २००३ लाच सिमेंटचा खांब उभारण्यात आला होता. तिथून त्यांचे शेत अवघ्या ६० फुटांवर आहे. त्यामुळे त्यावरूनच मला कनेक्शन द्या, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु काही ना काही कारणे सांगून त्यांना ते दिले जात नव्हते. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची अडवणूक सुरू होती. आता त्याच खांबावरून ‘महावितरण’ने त्यांना कनेक्शन जोडून दिले; परंतु त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील १२ वर्षे वाया गेली. अनामतही जमा निकम यांनी पहिल्यांदा १९९३ मध्ये कनेक्शनसाठी १९१० रुपये अनामत भरली होती. ती परत द्यायलाही महावितरण तयार नव्हते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्यांना लगेच १५ तारखेला १८७५ रुपयांचा बँक आॅफ महाराष्ट्रच्या वाई शाखेचा धनादेश महावितरणने पोस्टाने घरी पाठविला.