२२ तालुके नक्षलमुक्त!
By Admin | Updated: December 28, 2014 01:18 IST2014-12-28T01:18:30+5:302014-12-28T01:18:30+5:30
नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया तिथे अस्तित्वात नसल्यामुळे राज्यातील २२ तालुके नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळण्यात आले असून, तसा आदेश गृहविभागाने काढला आहे.

२२ तालुके नक्षलमुक्त!
राजेश निस्ताने - यवतमाळ
नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया तिथे अस्तित्वात नसल्यामुळे राज्यातील २२ तालुके नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळण्यात आले असून, तसा आदेश गृहविभागाने काढला आहे.
नक्षलींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २००४ साली गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील एकूण ३७ तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या तालुक्यांत सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. जानेवारी २०१४मध्ये नक्षलग्रस्त क्षेत्राचा फेरआढावा घेण्यात आला. तेव्हा ३७पैकी तब्बल २२ तालुक्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार शासनाने २२ तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळले आहे. त्यासंबंधीचा आदेश गृहविभागाकडून २६ डिसेंबर २०१४ रोजी जारी करण्यात आला. २२ तालुके नक्षलमुक्त घोषित केल्याने तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी आणि दरमहा दीड हजार रुपयांच्या भत्त्याला मुकावे लागणार आहे.
जिल्हानिहाय नक्षलमुक्त तालुके
गोंदिया : तिरोडा, गोरेगाव, गोंदिया हे तालुके आणि आमगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील भाग.
चंद्रपूर : चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जीवती, बल्लारशा (बल्लारपूर), पोंभूर्णा, मूल आणि सावली.
भंडारा : साकोली, लाखणी, लाखांदूर
नांदेड : किनवट.
यवतमाळ : पांढरकवडा, झरीजामणी, घाटंजी, आर्णी, वणी.
गडचिरोली जिल्हा : संपूर्ण जिल्हा.
गोंदिया जिल्हा : सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडकअर्जुनी.