रस्ते घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २२ जण जेरबंद
By Admin | Updated: June 21, 2016 18:42 IST2016-06-21T18:42:03+5:302016-06-21T18:42:03+5:30
महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात आॅडिट कंपनीच्या १० लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती.

रस्ते घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २२ जण जेरबंद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात आॅडिट कंपनीच्या १० लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर कंत्राट कंपनीच्या ठेकेदारांसह तेथील सुपरवायझर आणि साईट इंजिनीअरची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत तब्बल २२ जणांना अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या काही संशयित अधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरु असून, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी लोकमतला सांगितले.
मंगळवारी सकाळी या प्रकरणात आणखी तीन साईट इंजिनीअरला अटक केली. दत्तात्रय सुदान धास (एम/एस महावीर रोड अॅण्ड इन्फ्रा.), आशिष रामनाथ जैस्वाल (एम.एस जे.के कुमार कंन्स्ट्रक्शन जेवी) आणि रीशीकेश गजानन शिंदे (एम/एस जे.कुमार - के.आर कंन्स्ट्रक्शन) अशी अटक साईट इंजिनिअरची नावे आहेत. या धरपकडमध्ये आतापर्यंत तब्बल २२ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांनी संगनमत करुन कोणतेही काम न करता खोटी बिले पालिकेला दाखवून ३५२ कोटींचा घपला करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका अटक आरोपींवर आहे. मात्र पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला धरुन त्यांनी हा प्रताप केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचा मोर्चा आता पालिका अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.