चंद्रकांत दडसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे, करीअरमध्ये भरारी घेतली पाहिजे अशा गावगप्पा सारेच रंगवतात... पण ते प्रत्यक्षात येत नाही, याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील २२.१ टक्के मुलींचे लग्न २० वर्षांपूर्वीच आटोपले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही १.१ टक्के मुलींचे बालविवाह होत असून, त्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. शहरी भागात हेच प्रमाण १५.६ टक्के आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या २०२३ च्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शहरी भागातील मुली ग्रामीण भागातील मुलींच्या तुलनेत उशिरा विवाह करतात. बहुतेक राज्यांमध्ये असेच दिसते. राष्ट्रीय स्तरावर मुलींचे विवाहाचे सरासरी वय २२.९ वर्षे आहे.
राज्य | टक्केवारी |
प. बंगाल | ५१.२ |
झारखंड | ४६.१ |
बिहार | ३८.३ |
आसाम | ३६.० |
ओडिशा | २९.८ |
छत्तीसगड | २९.२ |
मध्य प्रदेश | २८.० |
राजस्थान | २४.१ |
महाराष्ट्र | २२.१ |
उत्तर प्रदेश | १९.० |
पश्चिम बंगाल (६.३%) आणि झारखंडमध्ये (४.६%) मुलींचे विवाह अजूनही कमी वयात होतात तर जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये विवाह उशिरा होतात. २१ वर्षे व त्याहून अधिक वयात विवाह करण्याचे प्रमाण सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये (९०.३%) तर हरयाणामध्ये ८६.१% इतके आहे.
महाराष्ट्रात तरुणींचे १८ वर्षांपूर्वी विवाह लावून देण्याचे प्रमाण १ टक्के आहे. १८-२० वर्षे वयोगटात २०.७% विवाह होत असून, २१ वर्षे व त्याहून अधिक वयात ७८.३% विवाह होत आहेत.
विभाग | १८ वर्षांपूर्वी (%) | १८-२० वर्षे (%) | २१ वर्षे व त्याहून अधिक (%) |
भारत (एकूण) | २.१ | २५.० | ७२.९ |
ग्रामीण भाग | २.५ | २८.१ | ६९.४ |
शहरी भाग | १.२ | १७.० | ८१.८ |