२२ शेळ्या फस्त केल्या तरी भरपाई नाही
By Admin | Updated: December 26, 2015 00:37 IST2015-12-26T00:37:04+5:302015-12-26T00:37:04+5:30
सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या धापडपाडा या आदिवासी वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याने विठ्ठल शंकर येंदे यांच्या २२ शेळ्या फस्त केल्या. त्यांच्या आणखी तीन शेळ्या बेपत्ता आहेत.

२२ शेळ्या फस्त केल्या तरी भरपाई नाही
धसई : सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या धापडपाडा या आदिवासी वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याने विठ्ठल शंकर येंदे यांच्या २२ शेळ्या फस्त केल्या. त्यांच्या आणखी तीन शेळ्या बेपत्ता आहेत. भीमाशंकर अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी येंदे यांची भेट घेऊन पाहणी केली व या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र हे आदिवासी अभयारण्याच्या क्षेत्रात राहत असल्याने नुकसानभरपाई देता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडे आदिवासींनी नुकसानभरपाईची मागणी केली असता धापडपाडा अभयारण्याच्या राखीव क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे तेथे शेळ्या, गुरे चारण्यास बंदी असल्याचे सांगत नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत भीमाशंकर अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. डब्लू. बडवाईक यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ही घटना पुणे येथील मुख्यालयास कळविली आहे. नुकसानभरपाईचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
भीमाशंकर अभयारण्यामध्ये अद्याप बोरवाडी, सिद्धगड, धापडपाडा आदी गावे राखीव क्षेत्रामध्येच वसलेली आहेत. ही गावे भीमाशंकर अभयारण्याची हद्द घोषित होण्यापूर्वीच वसलेली आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वन्य जीव अभयारण्य विभागामार्फत होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून हे
प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असल्यामुळे पुनर्वसनाचे काम प्रलंबित आहे. परिणामी, या ग्रामस्थांना नाइलाजास्तव आपल्या मूळ परिसरातच राहावे लागत आहे. (प्रतिनिधी)