वार्षिक अंदाजपत्रक मंजुरीला २१ चा मुहूर्त
By Admin | Updated: May 5, 2014 22:29 IST2014-05-05T20:56:40+5:302014-05-05T22:29:26+5:30
आचारसंहितेनंतर पहिलीच आमसभा

वार्षिक अंदाजपत्रक मंजुरीला २१ चा मुहूर्त
आचारसंहितेनंतर पहिलीच आमसभा
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपासून लागू झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्यांच्या अधिकारात मंजूर केलेले जिल्हा परिषदेचे सन २०१४-१५ चे वार्षिक अंदाजपत्रक कार्योत्तर मंजुरीसह अन्य टंचाईच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी येत्या २१ मे रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
लोकसभेची आचारसंहिता असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यांना असलेल्या अधिकारात जिल्हा परिषदेचे सुमारे ३९ कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर केले आहे. या अंदाजपत्रकात बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाला झुकते माप दिल्याची चर्चा जिल्हा परिषद सदस्यांत आहे. त्यामुळे येत्या २१ मे रोजी होणार्या सर्वसाधारण सभेत सदस्य या वार्षिक अंदाजपत्रकात काही दुरुस्ती सुचविण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्यावरील सेनेचे गटनेते प्रवीण जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेली त्रिसदस्यीय समिती अद्यापही कागदावरच असल्याने त्याबाबतही सभेत ऐनवेळी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. याच सभेत ऐनवेळी अन्य काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)