दोनशे लीटर पाण्यासाठी ५० रुपये!
By Admin | Updated: March 15, 2016 01:25 IST2016-03-15T01:25:47+5:302016-03-15T01:25:47+5:30
मार्चच्या मध्यास जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळाने होरपळला आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात २०० लीटरच्या बॅरलसाठी

दोनशे लीटर पाण्यासाठी ५० रुपये!
- ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
मार्चच्या मध्यास जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळाने होरपळला आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात २०० लीटरच्या बॅरलसाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागत आहेत. गावखेड्यांमध्ये तर पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहेत.
पाणीसाठ्यांतील पाणी आटल्याने पाणी योजना बंद पडू लागल्या आहेत. दोन महिन्यांपासून नगर तालुक्यातील अनेक गावांत पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. देऊळगाव सिद्धी, वाळकी आणि परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याचा कानोसा घेतला असता, पाणीटंचाईचे विदारक चित्र समोर आले.
नगर तालुक्यातील १०५ पैकी ६० गावांत तीव्र दुष्काळी स्थिती आहे. विसापूर तलावातील पाणी आटल्याने घोसपुरी योजना बंद झाली आहे. त्यामुळे १५ गावांतील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे तेथे टँकर सुरू करावे लागणार आहेत.
१६० पाणी योजना बंद
जानेवारीत पाणीसाठे आटल्याने १२७ योजना बंद झाल्या. फेबु्रवारीत हा आकडा १३९ वर गेला. आता मार्चअखेर तो १६० च्या जवळपास पोहोचणार आहे. सर्वाधिक पाणीटंचाई कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि नगर तालुक्यांत जाणवत आहे.