बलात्कारी आरोपींना २० वर्षांचा कारावास
By Admin | Updated: July 21, 2016 19:14 IST2016-07-21T19:14:23+5:302016-07-21T19:14:23+5:30
सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी २० वर्षांचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावली.

बलात्कारी आरोपींना २० वर्षांचा कारावास
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २१ : आलापल्ली येथे जांभळे विकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या गावी सोडून देण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी २० वर्षांचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावली.
किशोर खगेंद्रनाथ मंडल व प्रदीप परिमल बिश्वास दोघेही रा. मोदुमोडगू ता. अहेरी अशी आरोपींची नावे आहेत. २८ जून २०१४ रोजी पीडित मुलगी ही आपल्या चुलत भावाबरोबर जांभूळ विकण्यासाठी आलापल्ली येथे बसने आली होती. जांभूळ विकून झाल्यानंतर सायंकाळी ८ वाजताच्यादरम्यान ती आलापल्ली बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. त्याच ठिकाणी मासे विकत असलेल्या किशोर मंडल व प्रदीप बिश्वास हे दोघेही मुलीजवळ जाऊन तिला गावी जाण्यासाठी बस नसल्याने दुचाकीने सोडून देण्याचे आमिष दाखविले.
त्यामुळे पीडित मुलगी व तिचा चुलत भाऊ हे दोघेही आरोपींच्या दुचाकीवर बसले. गावापासून १ किमी अंतरावर मोटारसायकलमधील पेट्रोल कमी आहे म्हणून आरोपी किशोर याने त्याचा साथीदार आरोपी प्रदीप यास पीडित मुलीच्या भावास घरी सोडून वापस येण्यास सांगितले. त्यानंतर किशोरने त्या मुलीला नाल्याकडे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ती मुलगी बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला ६० रूपये देऊन आरोपींना पळ काढला. संबंधित घटना मुलीने आईला सांगितली. दुसऱ्या दिवशी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली. आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
न्यायालयात पीडित मुलगी व इतर साक्षीदारांचे सरकार पक्षातर्फे बयान नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरला व २१ जुलै रोजी दोन्ही आरोपींना कलम ३७६ (ड) अन्वये दोषी ठरवून २० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पीएसआय जयेश खंदरकर, नितीन शिंदे यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला पाच हजार रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी काम पाहिले होते