२० वर्षांनी औषधविक्रेता निर्दोष!
By Admin | Updated: November 6, 2015 00:58 IST2015-11-06T00:58:46+5:302015-11-06T00:58:46+5:30
‘एमआरपी’पेक्षा पाच रुपये अधिक आकारून औषधे विकल्याची तक्रार झाल्यामुळे यवतमाळ येथील एका औषधविक्रेत्याला २० वर्षे मन:स्ताप सहन करावा

२० वर्षांनी औषधविक्रेता निर्दोष!
नागपूर : ‘एमआरपी’पेक्षा पाच रुपये अधिक आकारून औषधे विकल्याची तक्रार झाल्यामुळे यवतमाळ
येथील एका औषधविक्रेत्याला २० वर्षे मन:स्ताप सहन करावा
लागला. १९९५मधील या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या औषधविक्रेत्याला निर्दोष सोडले. जाणीवपूर्वक पाच रुपये अधिक घेण्यात आले याचे पुरावे नसल्याचा लाभ औषधविक्रेत्याला मिळाला.
मोहन जोशी (७३) असे औषधविक्रेत्याचे असून त्यांचे श्रीराम मेडिकल स्टोअर्स आहे. त्याच दुकानात ही घटना घडली. विशेष न्यायालयाने ३ जून १९९९ रोजी मोहन जोशी यांना जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम ७, ३ व औषधी द्रव्ये आदेशमधील कलम २४ व १६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध जोशींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी विविध बाबी लक्षात घेत, आॅक्टोबरमध्ये विशेष न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द करून आरोपीला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले.
अशी केली तक्रार
३ नोव्हेंबर १९९५ ला आर्णी येथील रवींद्र चल्लावार यांनी श्रीराम मेडिकल स्टोअर्समधून ‘सेफ २५०’ या सहा कॅप्सुल्सची स्ट्रिप ३८.५० रुपयांत विकण्यात आली. स्ट्रिपवर ३३.५० रुपये एमआरपी होती.
दुकानदाराने पाच रुपये जास्त घेतल्याचे लक्षात आल्यानंतर चल्लावार यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार पाठविली. त्यावरून निरीक्षकांनी दुकानातून बिलाची प्रतिलिपी जप्त केली. न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.