२०८ जखमींच्या उपचारासाठी २६ लाखांचा खर्च!
By Admin | Updated: June 9, 2016 04:27 IST2016-06-09T04:27:45+5:302016-06-09T04:27:45+5:30
एमआयडीसीतील प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत झालेल्या रिअॅक्टरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला

२०८ जखमींच्या उपचारासाठी २६ लाखांचा खर्च!
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- एमआयडीसीतील प्रोबेस एंटरप्रायजेस या रासायनिक कंपनीत झालेल्या रिअॅक्टरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०८ जण जखमी झाले होते. त्यातील १४ जणांची प्रकृती गंभीर होती. स्फोटातील दोन जखमी अजूनही उपचार घेत आहेत. दरम्यान, जखमींच्या उपचारासाठी २६ लाख रुपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी अथवा कल्याणचे तहसीलदार यासंदर्भातील तपशील दोन दिवसांत वरिष्ठांना दिला जाणार आहे. सर्व माहिती एकत्र झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर, ते नुकसानभरपाईबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचारी, नागरिक होते. अजूनही उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली.
>माहिती संकलनाचे काम सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटातील मृतांच्या वारसांंना, जखमी व नुकसान झालेल्यांना अजूनही भरपाई का जाहीर केली नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र अद्यापही माहिती संकलन करणे, खर्च निश्चित करणे, आदी काम सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विविध विभागांची १५ पथके ही माहिती गोळा करत आहेत. एका पथकात चार-पाच जण आहेत. त्या पथकांची माहिती घेणे, तपशील संकलित करणे आदी सर्व जबाबदारी प्रांताधिकारी व तहसीलदारांवर आहे.
>बैठकीत काहीच निष्पन्न नाही
स्फोटासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीची दुसरी बैठक बुधवारी झाली. मात्र, त्यातही काहीही स्पष्ट झाले नाही. या समितीने मागील आठवड्यात घटनास्थळी भेट दिली होती. तसेच तज्ज्ञांशी चर्चा झाली होती. स्फोटासंदर्भातील फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टसह अन्य तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल, असे समितीतील सूत्रांनी सांगितले. या समितीला महिनाभरात अहवाल सादर करायचा असून आता १५ दिवस उरले आहेत.