टेम्पोच्या धडकेने २ शाळकरी मुली ठार
By Admin | Updated: July 8, 2016 18:41 IST2016-07-08T18:41:39+5:302016-07-08T18:41:39+5:30
वाल्हे येथे मालवाहू टेम्पोने समोरून सायकलवरून येणाऱ्या तीन शालेय मुलींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय मुली जागीच ठार झाल्या आहेत.

टेम्पोच्या धडकेने २ शाळकरी मुली ठार
ऑनलाइन लोकमत
नीरा, दि. ८ : वाल्हे येथे मालवाहू टेम्पोने समोरून सायकलवरून येणाऱ्या तीन शालेय मुलींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय मुली जागीच ठार झाल्या आहेत. एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाल्हे येथील सुकलवाडी फाट्यानजीक बोल्हाईच्या चढावर असलेल्या उताराला पालखी मार्गावर हा अपघात घडला. या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही शालेय मुलींची नावे निकिता सुनील पवार (वय १५) आणि अमृता विश्वास सातपुते (वय १४) अशी असून ऐश्वर्या बंडू पवार (वय १५) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. सुकलवाडीमध्ये राहणाऱ्या दोन्ही मुलींच्या अपघाती मृत्यूमुळे वाल्हे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी :
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथील सुकलवाडी फाट्याजवळ असलेल्या बोल्हाईच्या चढावर उताराला नीरा बाजूकडून जेजुरी बाजूकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने (एमएच ४२ / बी ४७८५) समोरून तीन सायकलवरून येणाऱ्या मुलींना धडक देऊन अपघात केला. अपघातात निकिता पवार आणि अमृता सातपुते या दोन्ही शाळकरी मुली जागीच ठार झाल्या. ऐश्वर्या पवार गंभीर जखमी झाली. या तिन्ही शाळकरी मुली सकाळी क्लासवरून घरी परतताना हा अपघात घडला.
अपघातानंतर या तिन्ही शाळकरी मुलींना उपचारासाठी जेजुरीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, शासकीय रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती समजते. जखमी ऐश्वर्या पवार हिच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असल्याची माहिती समजते.