मुंबई : वृक्ष लागवडीच्या माध्यमातून हरित महाराष्ट्रासाठी १ जुलै रोजी तब्बल २ कोटी झाडे लावली जाणार असून या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी विविध संस्थांवर सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वित्त व वनमंत्री मुनगंटीवार यांनी आज लोकमत कार्यालयास भेट देऊन या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली. लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, सर्व शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, संस्था, नागरिक, उद्योगजगत आदींच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. वन खात्यामार्फत १ कोटी ५० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांवर ५० लाख झाडे लावण्याचा शब्द दिला आहे. या शिवाय, लोकसहभागातून तेवढीच झाडे लावण्यात येतील. त्यामुळे दोन कोटींहूनही जादा वृक्षांची एकाच दिवशी लागवड केली जाणार आहे. वृक्ष संवर्धनासाठी एक हजार झाडांमागे एका व्यक्तीला (निवृत्त कर्मचारी, ग्रामस्थ, युवक, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, बचत गटांचे सदस्य आदी) जबाबदारी दिली जाईल. त्याकरता मानधनही देण्यात येईल. प्रत्येक धर्मात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे. १ जुलैच्या व्यापक वृक्षारोपणात त्या आधारेही लागवड केली जाईल. १५३ प्रकारच्या वृक्षांची लागवड राज्यात केली जाणार असून झाडांची पर्यावरण व अन्य उपयुक्तता हा निवडीचा मुख्य निकष असेल. वनविभागाने या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी तीन महिन्यांपासूनच नियोजन केले आहे. या अभियानासाठी १५ जूनपासून आपण महसूल विभागवार बैठकी घेणार आहोत. १ जुुलैनंतर तीनच दिवसांत संपूर्ण अभियानाचा आढावा घेतला जाईल. हे अभियान १ जुलैपुरते नाही तर ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असेल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>व्याघ्र प्रकल्पाची मोफत सफरवृक्ष लावल्यानंतर त्यासोबतचा स्वत:चा फोटो वन विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात यावा. यात सहभागी झालेल्या ज्या व्यक्तींची निवड लकी ड्रॉ द्वारे होईल त्यांना व्याघ्र प्रकल्पासाठी लागणारे प्रवेश शुल्क न आकारता मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद विभागाकडून उपलब्ध करून दिला जाईल. स्पर्धेत याशिवाय काही बक्षीसेही दिली जातील, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले.२१ जूनला योगदिवस राज्यभर साजरा होणार आहे. त्याच दिवशी प्रत्येक ग्रामसभेत १ जुलैच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरुप दिली जाणार आहे. केवळ वनक्षेत्रावरच नव्हे तर अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाईल. रस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार वृक्ष उभे राहतील.
लोकसहभागातून राज्यात २ कोटी वृक्ष लागवड
By admin | Updated: June 10, 2016 05:11 IST