1993 Blasts: What was our fault ...? | १९९३ बॉम्बस्फोट प्रकरण : आमचा दोष काय होता...?
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण : आमचा दोष काय होता...?

मुंबई : मी ‘तो’ दिवस कधीच विसरू शकत नाही. २५ वर्षांपूर्वी याच दिवशी शेकडो लोकांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि अंगावर भळभळत्या जखमांच्या त्या वेदना मी आजही अनुभवतोय; १९९३च्या बॉम्बस्फोटात जखमी झालेले कीर्ती अजमेरा सांगत होते. मात्र, इतक्या वर्षांत सरकारकडून काहीच मदत झाली नाही. ‘त्या’ दिवशीच्या जखमांच्या वेदना २५ वर्षे सहन करणाºया अजमेरा यांनी यानिमित्ताने ‘आमचा दोष काय होता...?’ असा सवाल सरकारला केला आहे.
मालाडच्या मार्वे रोड परिसरात कुटुंबीयांसह अजमेरा यांनी ‘१९९३ बॉम्बब्लास्ट’ लिहिलेला केक रविवारी १.२० वाजता कापला. २५ वर्षांपूर्वी देशाला हादरविणारे साखळी बॉम्बस्फोट मुंबईत झाले. यात शेकडो लोक मारले गेले, तर हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतरही मुंबईत बॉम्बस्फोट झाले. पण जखमी अथवा मृतांच्या कुटुंबीयांना उपचार अथवा त्यांच्या नुकसानभरपाईसाठी अद्याप कोणतेही ठोस धोरण नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी सरकारची धोरणे आहेत. मात्र, बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाया मानवनिर्मित संकट आहे. ज्यात आमच्यासारख्या निष्पाप लोकांचा जीव जातो. यामध्ये आमचा दोष काय आहे, असा सवाल अजमेरा यांनी केला आहे. आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळावा यासाठी गेली २५ वर्षे मी पाठपुरावा करत आहे. मात्र, सरकारचे दुर्लक्षच आहे.

केक कापून दर्शवली सरकारची निष्क्रियता

मी हा दिवस केक कापून साजरा करण्यामागे सरकारची निष्क्रियता दर्शवून देणे हाच उद्देश आहे. अद्याप माझ्या उपचारासाठी ४० ते ५० लाख रुपयांचा खर्च कुटुंबाने केला आहे. सरकारकडून मला एकाही पैशाची मदत मिळाल नाही. माझ्या जागी इतर कोणी असते तर त्याचे वाचणे अशक्य होते. याचा विचार सरकारने करायला हवा. नैसर्गिक आपत्ती ओढावलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी पॉलिसी सरकारने तयार केलीय, तशीच दहशतवादी कारवायांमध्ये जखमी अथवा मृत लोकांसाठीही करायला हवी. यासाठी मी राष्ट्रपती, पंतप्रधानांना विनंती अर्ज केला आहे. मी सतत याचा पाठपुरावा करत राहीन. कारण कदाचित यासाठीच देवाने मला आयुष्य दिले असावे.
- कीर्ती अजमेरा, १९९३च्या बॉम्बस्फोटातील पीडित


सुरक्षेचे आव्हान अजूनही कायमच !

एअर इंडिया इमारत, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, काथा बाजार, मशीद बंदर, शिवसेना भवनाजवळील इमारत, वरळी सेंचुरी बाजार, हॉटेल सीरॉक, हॉटेल एअरपोर्ट सेंटॉर, जुहू सेंटॉर येथे १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेला आज २५ वर्षे उलटली असली, तरी प्रत्यक्षात मात्र येथील सुरक्षेचे आव्हान आजही कायम आहे. रेल्वे स्थानकांसह मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक जागांवरील सुरक्षा व्यवस्था आजही तोकडी असून, सुरक्षेबाबतच्या अत्याधुनिक यंत्रणा आवश्यक आहेत.


सीएसएमटी, एलटीटी, दादर टर्मिनस, दादर रेल्वे स्थानकासह एसटी डेपो, विमानतळ परिसर आणि गजबजलेल्या बाजारापेठांमध्ये आजही सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही. मोक्याची ठिकाणे वगळता, कित्येक ठिकाणी बसविण्यात आलेली मेटल डिटेक्टर्स धूळखात पडली आहेत. सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तोकडा पडत आहेत. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली, तरीदेखील प्रत्यक्षात मात्र सुरक्षा यंत्रणेसाठीचे मनुष्यबळ अपुरे आहे.

परिणामी, मुंबई पोलिसांसह उर्वरित सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण वाढतच असून, हा ताण पेलण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेचा विचार करताना, केवळ पोलीस अथवा तत्सम यंत्रणांना जबाबदार आहेत, असे नाही, तर येथील प्रत्येक घटकाने सावध होण्याची गरज आहे. सामान्यातला सामान्य मुंबईकरदेखील सजग राहिला आणि मुंबापुरीच्या सुरक्षेसाठी दक्ष राहिला, तर सुरक्षेचे आव्हान मोडीत काढण्यात येथील सर्वच यंत्रणांना यश प्राप्त होईल.

Web Title:  1993 Blasts: What was our fault ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.