१९ लाखांचे बोगस बीट बियाण्यांचा साठा पकडला

By Admin | Updated: June 11, 2014 01:34 IST2014-06-11T01:34:28+5:302014-06-11T01:34:28+5:30

कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा पथकाने गत दोन दिवसांत नागपूर विभागात ठिकठिकाणी धाडी घालून १९ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बोगस बीटी बियाणे पकडले आहे.

19 lakhs of bogus beet seeds seized | १९ लाखांचे बोगस बीट बियाण्यांचा साठा पकडला

१९ लाखांचे बोगस बीट बियाण्यांचा साठा पकडला

कृषी विभागाची कारवाई : धाडसत्र सुरूच
नागपूर : कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा पथकाने गत दोन दिवसांत नागपूर विभागात ठिकठिकाणी धाडी घालून १९ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बोगस बीटी बियाणे पकडले आहे. यात सोमवारी हिंगणा येथे पहिली कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईने बोगस बियाणे विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. लोकमतने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ‘शेतकरी बोगस बीटी बियाण्याच्या मोहात’ या मथळ्याखाली एक बातमी प्रकाशित करून, नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाण्याची विक्री होत असल्याकडे कृषी विभागाचे लक्ष वेधले होते.
माहिती सूत्रानुसार कृषी विभागाचे विभागीय गुणनियंत्रण अधिकारी डी. एस. तसरे यांना हिंगणा परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाणे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी दुपारी विभागीय व जिल्हा पथकाच्या मदतीने येथील पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सवर धाड घातली. दरम्यान या दुकानात कवच, लॉटरी व यशोदा-२५५ नावाने विक्री केले जात असलेले बीटी बियाण्याचे ६ हजार ५४० पाकिट आढळून आले. त्यांची सध्या बाजारात किंमत सुमारे ६ लाख ७० हजार रुपये आहे. कृषी अधिकाऱ्यांनी त्या बियाण्याची चौकशी केली असता, त्या पाकिटवर पॅकेजिंग व विक्री म्हणून औरंगाबाद येथील कीर्तीमान कंपनीचा उल्लेख आढळून आला. परंतु त्यासंबंधी पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सच्या मालकाला विचारणा केली असता, त्यांनी तो संपूर्ण माल हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सीड्स नावाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी बिलाची चौकशी केली असता, त्यावर नॉव्हेल्टी हायब्रीड सीड्सचा उल्लेख आढळून आला. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, नॉव्हेल्टी हायब्रीड सीड्स अशा नावाची सध्या कोणतीही कंपनी अस्तित्वाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्री केल्या जात असलेले हे बियाणे कुठे तयार झाले व ते कुठून आले याविषयी विक्रेत्याकडे कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी लगेच पवन अ‍ॅग्रो ट्रेडर्सविरुद्ध विक्री बंदीचे आदेश जारी करून, येत्या २१ जूनपर्यंत कृषी विभागाकडे आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
याशिवाय दुसरी कारवाई ही चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे करण्यात आली आहे. तेथे एकूण ८३७ पाकिट पकडण्यात आले असून, त्यांची किमत ७ लाख ७८ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील, हिंगणा येथील तालुका कृषी अधिकारी रत्नाकर येवले, मोहीम अधिकारी ए. डी. गायमुखे व जिल्हा गुणवत्ता निरीक्षक पी. एन. म्हसकर यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 19 lakhs of bogus beet seeds seized