जिल्ह्यातील १९ धरणे ओव्हरफ्लो
By Admin | Updated: July 20, 2016 03:21 IST2016-07-20T03:21:47+5:302016-07-20T03:21:47+5:30
पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यातील १९ धरणे ओव्हरफ्लो
अलिबाग : पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांपैकी १९ धरणे पूर्णपणे भरुन वाहू लागली आहेत. या सर्व धरणांतील उपलब्ध जलसाठा ८३.३८ द.ल.घ.मी. झाला आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र खड्डे बुजवण्यात येत नसल्याने प्रवासीवर्गात संतापाची लाटच उसळत आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण २५ हजार ३३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३३ मि.मी. पावसाची नोंद तळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पनवेल-११४, रोहा-११८, माणगांव-१२०, अलिबाग-८९, पेण-६०, मुरुड-७५, उरण-३५, कर्जत-७९.८०, खालापूर-९४, सुधागड-९५.५०, महाड-५३, पोलादपूर-७१, म्हसळा-९८, श्रीवर्धन-७२, माथेरान-९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोलाड येथे १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या शेजारील कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ होवून ती २२.७० मीटर झाली आहे. या नदीची धोकादायक पूर पातळी २३.९५ मीटर आहे. पाताळगंगा नदीची पातळी १९.३० मीटर झाली असून धोकादायक पूर पातळी २१.५२ मीटर आहे. उल्हास नदीची प्रत्यक्ष पातळी ४२.८० मीटर असून धोकादायक पूर पातळी ४८.७७ मीटर आहे. उर्वरित अंबा, सावित्री व गाढी या नद्यांची पातळी नियंत्रणात आहे
>आगरदांडा : मुरुड तालुक्यात सोमवारपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुरुड शहरातील जुनी पेठे, गावदेवी पाखाडी व सबनीस आळी येथे दोन फुटांपेक्षा जास्त पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळच्या सत्रात मुलांना शाळेत जाताना खूप अडचणीला सामोरे जावे लागले. वाहनचालकांना पाण्यातून गाडी चालवताना कसरत करावी लागली. त्यामुळे मुरुड बाजारपेठेत व ग्रामीण भागात शुकशुकाट होता. जिकडे तिकडे पाणी साचल्याचे दिसत होते. मुरुड तालुक्यात एकंदर एकूण पाऊस २०१२ मि.मी. पडला असून, आजचा पाऊस ७५ मि.मी. पेक्षा जास्त पडल्याने तहसील कार्यालयाकडून संदेश वाळंज यांनी सांगितले.
>चौल - रेवदंडा जनजीवन विस्कळीत
रेवदंडा : मागील आठवडाभर पावसाने चौल-रेवदंडा परिसराला झोडपून काढले असताना मंगळवारी पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहन चालक खड्ड्यांतून प्रवास करताना मेटाकुटीला आले. पाऊस पडत असल्याने भाजी व फळबाजार ठप्प पडलेला दिसत होता. दूध व वृत्तपत्रांच्या गाड्या उशिरा आल्या, शाळांमधील उपस्थिती रोडावलेली दिसत होती. बँका व कार्यालयात व्यवहार करण्यासाठी ग्राहक दिसत नव्हते. मुसळधार पावसाने लावण्या थंडावल्या आहेत. बाजारात शुकशुकाट जाणवत होता.
>नागोठणेत मुसळधार पाऊस
नागोठणे : काही दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. मंगळवारी शहरातील अंबा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरात पूर येण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतामध्ये फूट-दोन फूट पाणी साचल्याने बाकी राहिलेली भात लावणीची कामे ठप्प झाली आहेत.
>पावसामुळे खुरावले फाटा ते महागाव रस्त्याची दुरवस्था
पाली : दमदार पावसाने खुरावले ते महागाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साईडपट्ट्या तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना, तसेच वाहनचालकांनी त्रास सहन करावा लागत आहे.
खुरावले-महागाव या रस्त्यावरून श्री क्षेत्र रामेश्वर येथे जाण्याकरिता मार्ग असल्याने वाहतूक २४ तास सुरू असते. कित्येक दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहे. वन विभागातून जाणारा रस्ता हा अनेक ठिकाणी खराब झाला आहे.
मुसळधार पावसामुळे सर्व शेती पाण्याखाली गेल्याने काही शेतकरीवर्ग चिंतेत आहे. जोरदार पावसामुळे एसटी गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून गाड्या एक ते दोन तास उशिरा धावत आहेत. याबाबत एसटी प्रशासनाकडे चौकशी केली असता वडखळ, पेण, अलिबाग, रेवदंडा आदि ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने बस आगारात उशिरा पोचत आहेत. जोरदार पाऊस पडत असल्याने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय लवकर सोडण्यात आले.