महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांसाठी १८८ कोटी मंजूर
By Admin | Updated: May 3, 2016 02:53 IST2016-05-03T02:53:22+5:302016-05-03T02:53:22+5:30
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात नाशिकसाठी ३४.९ कोटी आणि सिंधुदुर्गसाठी ८२.७६ कोटी रुपयांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांसाठी १८८ कोटी मंजूर
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात नाशिकसाठी ३४.९ कोटी आणि सिंधुदुर्गसाठी ८२.७६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
मंजूर केलेल्या निधीपैकी ३०.२३ कोटी महाराष्ट्र सरकारला आधीच दिले आहेत. केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. शर्मा म्हणाले, पर्यटन स्थळांची ओळख पटविणे आणि तेथे पर्यटकांसाठी सुविधा विकसित करणे हे राज्य सरकारचे काम आहे. राज्य सरकारने नाशिक येथे एकूण ४९ पर्यटन स्थळे चिन्हित केलेली आहेत. त्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, कोटामगाव, चंदवाद, ताकेड, अंजनेरी, मांगीतुंगी मंदिर, नंदूर, बालाजी मंदिर, हरिहर किल्ला, तपोवन, पांडव लेणी, पंचवटी, सीता लेणी, श्री सोमेश्वर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, रामकुंड, अण्णा गणपती मंदिर आणि माधमेश्वर यांचा समावेश आहे.
नाशिक येथे संमेलन केंद्रासाठी २०११-१२ मध्ये पाच कोटी रुपये मंजूर केले होते, ज्यापैकी चार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय गंगापूर धाम, नाशिक शहर, गोवर्धनमधील कलाग्रामसाठी २४.८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्यापैकी १२.४५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. द्राक्षे आणि वाईन पर्यटनाच्या विकासासाठी केंद्राने पाच कोटी रुपये मंजूर केले. त्यासाठी मुख्य इमारत, दोन मजली विला, रस्ते आणि भिंत बांधण्यावर एक कोटी रुपये खर्च केल्याची माहिती शर्मा यांनी दिली.
तर थीम आधारित पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने ‘प्रसाद’ आणि ‘स्वदेश दर्शन’ अशा दोन योजना सुरू केल्या आहेत. ‘स्वदेश दर्शन’अंतर्गत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग तटवर्तीय सर्किटच्या विकासासाठी ८२.७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.