१८० आमदार घेऊनच दर्शनाला येईन!
By Admin | Updated: November 5, 2014 04:13 IST2014-11-05T04:13:27+5:302014-11-05T04:13:27+5:30
वीच्या आशीर्वादाने शिवसेनेने विधानसभेत मोठे यश संपादित केले आहे़ या वेळी ६३ आमदार घेऊन दर्शनाला आलो आहे

१८० आमदार घेऊनच दर्शनाला येईन!
लोणावळा : देवीच्या आशीर्वादाने शिवसेनेने विधानसभेत मोठे यश संपादित केले आहे़ या वेळी ६३ आमदार घेऊन दर्शनाला आलो आहे, लवकरच मी १८० आमदार घेऊन दर्शनाला येईन व सर्वांना अभिमान वाटेल असे खरेखुरे रयतेचे राज्य निर्माण करीन, असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा देवीच्या साक्षीने केल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पक्षाच्या नवनिर्वाचित ६३ आमदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी कार्ला (ता. मावळ) येथील गडावर येत एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी व पुत्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे होते.
शिवाजी पार्क येथून सर्व आमदार खासगी वाहनांमधून, तर ठाकरे हेलिकॉप्टरने गडावर पावणेबाराला दाखल झाले़ देवीचे दर्शन, आरती व ओटीभरण करून पुढील काळात यापेक्षा मोठे यश मिळू दे, असे साकडे ठाकरे दाम्पत्याने घातले़ उद्धव ठाकरे यांनी या वेळी राजकीय भाष्य टाळले. तरीही त्यांच्या बोलण्यातून यापुढे स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा मानस स्पष्टपणे जाणवत होता़ ते म्हणाले, शिवसेना हिंदुत्वाची परंपरा कदापि सोडणार नाही. जे कार्य जनतेने आमच्या खांद्यावर सोपवले आहे, त्यामध्ये यश मिळावे यासाठी सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. सर्वांना अभिमान वाटेल असे रयतेचे राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव म्हणाले. (प्रतिनिधी)