१७५ कोटींची केली खैरात !
By Admin | Updated: June 8, 2015 02:41 IST2015-06-08T02:41:21+5:302015-06-08T02:41:21+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत.

१७५ कोटींची केली खैरात !
यदु जोशी, मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत. महिला समृद्धी योजनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या ३५ मतदारसंघांमध्ये तब्बल तब्बल १७५ कोटी रुपयांची निवडणूकपूर्व खैरात करण्यात आली. त्यात असंख्य बोगस प्रकरणे करून निधीचा अपहार करण्यात आल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीचे
विद्यमान आमदार रमेश कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाला.
मातंग आणि इतर १२ पोटजातींतील अत्यंत गोरगरीब महिलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठीची महिला समृद्धी योजना महामंडळाकडून राबविली जाते. प्रती महिला ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज वितरीत केले जाते. विरोधी पक्ष तर सोडाच, पण मित्रपक्ष काँग्रेसच्या एकाही आमदाराच्या मतदारसंघात या योजनेंतर्गत निधी देण्यात आला नाही. फक्त राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांच्या मतदारसंघांत निधीची खैरात करण्यात आली. शेकडो बोगस प्रकरणे तयार करून कर्ज उचलण्यात आले. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी हे कथित कर्जवाटप करण्यात आले होते.
ज्या महिलांच्या नावावर कर्ज घेण्यात आले होते, त्यांना आता कर्जवसुलीसाठी नोटिसा दिल्या जात आहेत. नोटिसा आल्यानंतर त्यांना आपल्या नावावर कर्ज असल्याचे कळले. या बोेगस कर्जाबाबत पुणे, औरंगाबाद, सोलापूर, बीड आदी जिल्ह्यांमधून तक्रारींचा ओघ आता सामाजिक न्याय विभागाकडे सुरू झाला आहे.
१७५ कोटी रुपयांचे हे कर्ज केवळ चार महिन्यांत कसे आणि कोणत्या अटी, निकषांवर वाटण्यात आले, याचा कोणताही रेकॉर्ड महामंडळाकडे नाही. एकावेळी अनेक महिलांचे अर्ज आले असतील तर लकी ड्रॉने नावे काढून कर्ज देण्याची पद्धत आहे. मात्र कोणत्या महिलांच्या नावे कर्जप्रकरणे करायची याची यादी आधीच तयार करण्यात आली होती. त्यांच्याच नावांवर पैसे उचलण्यात आले. या बोगस प्रकरणांची व्यापक चौकशी आता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात राज्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत.
हे जोशी, कुळकर्णी कोण ?
> मातंग समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या या महामंडळात रमेश कदम यांचे निकटवर्ती असलेल्या जोशी - कुलकर्णी यांनी घातलेल्या सावळ्यागोंधळाची चौकशी झाली, तर अधिक पर्दाफाश होईल.
> महामंडळातील एक अधिकारी आपले म्हणणे ऐकत नाही, म्हणून त्याला चेंबूरच्या कार्यालयातच मारहाण केली होती. पुढे हा अधिकारी गैरव्यवहारात सामील झाला. आता तो माफीचा साक्षीदार बनू पाहात आहे.
> रोजंदार म्हणून कामावर लागलेली एक महिला या महामंडळात चक्क उपमहाव्यवस्थापक पदावर कशी पोहोचली, तिचे काय लागेबांधे होते, याबद्दलही उलटसुलट चर्चा आहे.
> या संपूर्ण घोटाळ्याची माहितीच्या अधिकारात माहिती घेणाऱ्या उच्च न्यायालयातील एका वकिलास जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.