१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’
By Admin | Updated: January 25, 2015 00:59 IST2015-01-25T00:59:19+5:302015-01-25T00:59:19+5:30
मकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात.

१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’
नासीर कबीर - सोलापूर
मकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात. याच भेटवस्तू दरवर्षी एका गरजू विद्यार्थिनीला पायावर उभा राहण्यासाठी उपयोगी पडत आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त करमाळ्यात ओम महिला मंडळाने वाणासाठी भेटवस्तूंची देवघेव न करता त्यासाठी लागणारे पैसे एकत्र केले अन् त्या पैशातून एका गरीब मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन सावित्रीच्या लेकींनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
शहरातील ओम महिला मंडळ गेल्या १७ वर्षांपासून दरवर्षी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या एका मुलीस शैक्षणिक दत्तक घेण्याचा उपक्रम राबवत आहे़ विशेष म्हणजे संक्रांतीच्या वाणासाठी जो खर्च होतो़ त्या खर्चातून हे मंडळ तिचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च करीत आहे. गेल्या वर्षी या मंंडळाने श्रीदेवीचा माळ येथील मूकबधिर शाळेस भांडी दिली होती. शाळेतील दोन मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्चही त्यांनी केला होता. एका मुलीचे वडील अकाली मृत झाल्यानंतर तिचा शैक्षणिक खर्चही या महिला मंडळाने केला.
कोणतीही अपेक्षा न ठेवता तसेच समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलीमुलांना शैक्षणिक मदत करण्याचे धोरण दरवर्षी राबवत असतो़
- अंजली श्रीवास्तव, अध्यक्षा, ओम महिला मंडळ, करमाळा