१७ विद्यार्थी, ५३ मिनिटे अन् गणरायाची ४ हजार रेखाचित्रे !

By Admin | Updated: September 27, 2015 05:59 IST2015-09-27T05:59:02+5:302015-09-27T05:59:02+5:30

औरंगाबादेत आयोजित केलेल्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमात १० शाळांतील १७ विद्यार्थ्यांनी अवघ्या ५३ मिनिटांत गणेशाची तब्बल ४ हजार २५ रेखाचित्रे रेखाटली आणि लोकमतने आणखी एक विश्वविक्रम घडविला.

17 students, 53 minutes and Ganataya 4 thousand drawings! | १७ विद्यार्थी, ५३ मिनिटे अन् गणरायाची ४ हजार रेखाचित्रे !

१७ विद्यार्थी, ५३ मिनिटे अन् गणरायाची ४ हजार रेखाचित्रे !

औरंगाबाद : औरंगाबादेत आयोजित केलेल्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमात १० शाळांतील १७ विद्यार्थ्यांनी अवघ्या ५३ मिनिटांत गणेशाची तब्बल ४ हजार २५ रेखाचित्रे रेखाटली आणि लोकमतने आणखी एक विश्वविक्रम घडविला. निर्गुणाची असंख्य विलोभनीय रूपे पाहून चकित झालेल्या उपस्थितांनी विक्रमवीरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
काही दिवसांपूर्वीच इंदूरमध्ये १९ विद्यार्थ्यांनी एका तासात १,४२५ चित्रे रेखाटली होती. त्यांचा विक्रम मोडीत काढत औरंगाबादच्या शिरपेचात नवीन तुरा खोवला गेला. लोकमतच्या वतीने ‘आपला बाप्पा’ या उपक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी रेखाटनाला सुरुवात झाली. ६ वाजून ३ मिनिटे म्हणजे ५३ मिनिटे झाली असताना सर्वांकडील ड्रॉइंग शीट संपल्याने विद्यार्थ्यांना थांबावे लागले. नसता गणराया साकारण्यात ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या या विद्यार्थ्यांनी ४ हजार २५ चा आकडा पार केला असता. अर्थात तोवर या विद्यार्थ्यांनी नवा विश्वविक्रम नोंदविला होताच. यापूर्वी लोकमतने औरंगाबादेत २५ जानेवारी २०१२ रोजी हजारोंच्या संख्येने एकसाथ ‘जण गण मन’ गात देशभक्तीचा नवा विश्वविक्रम स्थापित केला होता. त्यानंतर आज गणेशभक्तीचा नवा विश्वविक्रम स्थापित करून देशभक्ती व गणेशभक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, महापौर त्र्यंबक तुपे, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, माजी नगरसेवक प्रशांत देसरडा, गायकवाड एज्युकेशन ग्रुपचे संचालक प्रा. रामदास गायकवाड, एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम. के. अग्रवाल या विश्वविक्रमाचे साक्षीदार ठरले. सर्वप्रथम यादीवर प्रत्येक विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पाठीवर नंबर असलेले स्टिकर चिकटविण्यात आले. पाचवी ते दहावी इयत्तेमध्ये शिक्षण घेत असलेल्या या १७ विद्यार्थ्यांसाठी बरोबर ५ वाजून १० मिनिटांनी काउंटडाऊनला सुरुवात झाली आणि अवघ्या ३ सेकंदांत पहिल्या गणपतीचे चित्र साकारण्यात आले. विद्यार्थी एवढ्या चपळतेने कागदावर कुंचला चालवत होते, की काही सेकंदांत गणेशाची विविध रूपेसाकारली जात होती. विद्यार्थ्यांचा चित्र काढण्याचा वेग बघून सारेच जण थक्क झाले होते. प्रत्येक विद्यार्थी - विद्यार्थिनी आपल्या मनात साठवलेले लाडक्या बाप्पाचे रूप प्रत्यक्षात साकारत होते. आपल्या पाल्याची कला, कुशलता, चपळता पाहून पालकही थक्क झाले. सर्व जण होणाऱ्या विक्रमाकडे डोळे भरून पाहात होते. जसजसा वेळ वाढत होता तसतसा चित्र काढण्याचा वेगही वाढत होता. काही जण मांडी घालून, काही उक्कड, तर काही जण दोन्ही गुडघ्यांवर बसून चित्र रेखाटत होते.
उल्लेखनीय म्हणजे विघ्नहर्त्याच्या रूपातही विविधता दिसून आली. ऋग्वेदापासून लोककलावंताच्या गणापर्यंत सर्वत्रच गणरायाचे रूप आणि स्वरूप जनमानसात उभे केलेले आहे. ती सर्व रूपेविद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये पाहावयास मिळाली. यात काही मॉडर्न रूपांचाही समावेश
होता. ब्रह्मानंदी टाळी लागावी इतक्या तल्लीनतेने प्रत्येक जण विनायकाची विविध रूपेसाकारत होता. विशेषत: जे विद्यार्थी डावखुरे आहेत ते अतिवेगात चित्र साकारत होते, हे निरीक्षण इंडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी नोंदविले.
६ वाजून ३ मिनिटे (५३ मिनिटे) झाली असतानाच सर्वांकडील ड्रॉइंग शीट संपल्या. यामुळे विद्यार्थ्यांना आपला कुंचला थांबवावा लागला. या ५३ मिनिटांत गणरायाची ४ हजार २५ रूपे साकारून विश्वविक्रम झाल्याची घोषणा इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी नागेंद्र सिंग व रेखा सिंग यांनी केली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उपस्थितांनी लोकमत व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Web Title: 17 students, 53 minutes and Ganataya 4 thousand drawings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.