चोरीच्या १७ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 02:09 IST2016-06-08T02:09:55+5:302016-06-08T02:09:55+5:30
दुचाकी चोरीप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

चोरीच्या १७ दुचाकी जप्त
नवी मुंबई : दुचाकी चोरीप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरी केलेल्या दुचाकी त्यांनी मुंबई व नवी मुंबई परिसरात विकल्या होत्या. त्यापैकी १७ दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या असून, त्यामध्ये १२ अॅक्टीव्हा स्कूटर आहेत.
शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कसून तपासाला सुरवात केली आहे. त्याकरिता यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांमधील घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झालेल्या गुन्हेगारांच्या शोधावर देखील पोलिसांनी भर दिला आहे. अशाच एका पुराव्यावर कौशल्यपूर्ण तपासाअंती नेरुळ पोलिसांनी दोघा सराईत दुचाकी चोरांना अटक केली आहे. कामरान ऊर्फ रफिक खान (५३) व इस्माईल शेख (३५) अशी त्यांची नावे आहेत. नेरूळ परिसरातल्या वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यावर वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी जोर दिला होता. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक वासुदेव मोरे व सुशीलकुमार गायकवाड यांच्या तपास पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान कामरान हा त्यांच्या हाती लागला होता. त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर तपास पथकाने इस्माईल याला गोवंडी येथून अटक केली. कामरान हा उलवेचा तर इस्माईल हा गोवंडीचा राहणारा आहे. या दोघांच्या अधिक चौकशीत त्यांनी चोरलेल्या १७ मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केल्याचे परिमंडळ १ चे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. त्यामध्ये १२ अॅक्टीव्हा स्कूटर असून इतर पाच वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी आहेत. या एकूण वाहनांची सुमारे ४ लाख २० हजार किंमत आहे.
>बनावट कागदपत्रांचा वापर!
चोरलेल्या दुचाकींच्या नंबरप्लेट बदलून त्या नवी मुंबईसह मुंबई परिसरात स्वस्तात विकल्या होत्या. याकरिता त्यांनी बनावट कागदपत्रांचाही वापर केला असण्याची शक्यता आहे.
दोघांकडून नेरूळ परिसरातील सात व इतर ठिकाणचे पाच अशा १२ गुन्ह्यांची उकल झालेली आहे. या टोळीकडून इतरही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी व्यक्त केली.