१६२ कायम विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र
By Admin | Updated: February 10, 2015 02:40 IST2015-02-10T02:40:21+5:302015-02-10T02:40:21+5:30
कायम विनाअनुदानित तत्त्वावरील खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मूल्यांकन निकष

१६२ कायम विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र
मुंबई : कायम विनाअनुदानित तत्त्वावरील खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची त्रयस्थ समितीने पाहणी केली होती. त्यानुसार १६२ शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, यातील १,२९२ पदे अनुदानास पात्र ठरली.
मूल्यांकनाच्या सूत्रानुसार अनुदानास पात्र शाळांचे प्रस्ताव त्रयस्थ समितीकडून तपासून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १६२ शाळांना अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार १६२ शाळांमधील ४८६ वर्गांसाठी ८१० शिक्षक आणि ४८२ शिक्षकेतर अशा एकूण १,२९२ पदांनुसार या शाळांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विभागातील १४ शाळांचा समावेश आहे.
त्रयस्थ समितीकडून ४६२ शाळांपैकी १६२ शाळा अनुदानास पात्र ठरवल्या आहेत. परंतु ही प्रक्रिया यापूर्वी झाली असती तर शाळांना अनुदान मिळण्यात अडचण आली नसती. २० दिवसांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन आले असताना, या शाळांना निधी कधी मंजूर होणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे आम्ही शिक्षणमंत्र्यांकडे हा निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)