१६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाईचे सावट
By Admin | Updated: April 13, 2015 11:39 IST2015-04-13T05:11:18+5:302015-04-13T11:39:35+5:30
वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत

१६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाईचे सावट
अकोला : वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विभागातील ५६पैकी १६ तालुक्यांमध्ये मार्चअखेर १ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने नोंदविले आहे. तर २ तालुक्यांमध्ये २ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी एकूण ११० कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामध्ये २१ कूपनलिका, ६९ विंधन विहिरी, ३ तात्पुरत्या पूरक नळ योजनांची दुरुस्ती, ७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि १० विहिरींचे अधिग्रहण आदींंचा समावेश आहे. गत आॅक्टोबरअखेरपर्यंत ३ तालुक्यांतील पाणीपातळीत घट झाली असून, उर्वरित ४ तालुक्यांत मात्र भूजल पातळीत वाढ झाल्याचे चित्र आहे.