नऊ तहसीलदारांसह १६ अधिकारी निलंबित
By Admin | Updated: April 10, 2015 05:12 IST2015-04-10T05:12:02+5:302015-04-10T05:12:02+5:30
रेशन दुकानातील धान्याच्या गैरव्यवहारात अधिकारी, दुकानदार आणि वाहतूक ठेकेदार गुंतल्याचे आढळून आले असून, आतापर्यंत एकूण १२ लोकांना अटक करण्यात आली आहे,

नऊ तहसीलदारांसह १६ अधिकारी निलंबित
मुंबई : रेशन दुकानातील धान्याच्या गैरव्यवहारात अधिकारी, दुकानदार आणि वाहतूक ठेकेदार गुंतल्याचे आढळून आले असून, आतापर्यंत एकूण १२ लोकांना अटक करण्यात आली आहे, तर ९ तहसीलदारांसह १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.
रेशन धान्यातील वितरणात गैरव्यवहार करणाऱ्या वाहतूक ठेकेदारांसह दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही बापट यांनी सांगितले. बापट म्हणाले की, सुरगणा येथील शासकीय गोदामातील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकले जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल सादर केला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे स्वतंत्र दक्षता पथक आणि विधी सल्लागार नाहीत. त्यामुळे गृहविभागाशी चर्चा करून ३० ते ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापण्यात येईल. (प्रतिनिधी)