वृक्षतोडीमुळे १६ पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर !
By Admin | Updated: March 23, 2015 01:58 IST2015-03-23T01:58:47+5:302015-03-23T01:58:47+5:30
जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि उदासीन कारभारामुळे जिल्ह्यातील १६ पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़

वृक्षतोडीमुळे १६ पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर !
जितेंद्र विसपुते ल्ल जळगाव
जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि उदासीन कारभारामुळे जिल्ह्यातील १६ पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़ असेच सुरू राहिल्यास येत्या पाच वर्षांत या पक्ष्यांंचा अधिवास जिल्ह्यातून नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याच्या विकासाप्रमाणेच नैसर्गिक संपत्तीची देखभाल करणे हीसुद्धा प्रशासनाची जबाबदारी असते. जंगलांवरचे अतिक्रमण, त्यासोबत झालेली वृक्षतोड, शेतीमध्ये होणारा घातक रसायनांचा वापर, गवताळ वनस्पतींचा रोखला गेलेला विकास व शिकार यामुळे या प्रजातींचा अधिवास धोक्यात सापडल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे़ या पक्ष्यांच्या संवर्धनसाठी वन विभागाने तत्काळ संवर्धन मोहीम हाती घ्यावी़ यासाठी विशेष निधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवावा, अशी अपेक्षा आहे.
या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तत्काळ प्रयत्न होण्याची गरज सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी व्यक्त केली आहे़ तर आढळणाऱ्या पक्ष्यांची एकत्रित नोंदणी वन विभागाने करावी आणि स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी अभय उजगारे यांनी केली़
या प्रजाती धोक्यात
गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड, भारतीय लांब चोचीचे गिधाड, रानपिंगळा, नयनसरी, पॅलीड हॅरियर, पांढरा शेराटी, काळ्या मानेचा करकोचा, युरोपीयन चाष, पांढऱ्या मानेचा करकोचा, चित्रबलाक, हिरामण पोपट, नदीसूरय, युरेशियन कर्ल्यू, हिरवी मनोली आणि सर्प पक्षी लवकरच नामशेष होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्ह्यातील १६ प्रजातींचे पक्षी लुप्त होण्याचा मार्गावर आहेत़ पैकी किंग व्हल्चर हा पक्षी आज जिल्ह्यातून दिसेनासा झालेला आहे़ तत्काळ उपाययोजना न झाल्यास हे पक्षी पाच वर्षांनंतर पूर्णपणे लुप्त होतील़
- गणेश सोनार, पक्षी अभ्यासक
रानपिंगळा गेल्या काही वर्षांपासून दिसेनासा झाला आहे़ प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास येत्या ५ वर्षांत अनेक पक्षी जिल्ह्यातून लुप्त होतील़
- राहुल सोनवणे, पक्षिमित्र
जळगावमध्ये होणार पक्षीमोजणी
जितेंद्र विसपुते ल्ल जळगाव
इंग्लंडमधील संस्थेच्या पुढाकाराने बॉम्बे नॅचरल हिस्टरी आॅफ सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्यातून हतनूर जलाशयाच्या परिसरातील स्थानिक पक्ष्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे़ ‘बीएनएचएस’चे प्रकल्प अधिकारी डॉ़ नंदुकुमार दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव येथील ‘चातक नेचर कॅन्झर्व्हेशन’ संस्थेचे सदस्य पाहणी करीत आहेत.
सभोवतालच्या पक्ष्यांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते़ त्यांची मोजणी होत नाही़ ही बाब लक्षात घेऊन इंग्लंडमधील रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन आॅफ बर्डस् (आरएसपीबी) या संस्थेने ‘कॉमन बर्ड मॉनिटरिंग’ कार्यक्रम आखला़ बॉम्बे नॅचरल हिस्टरी आॅफ सोसायटीला या कार्यक्रमासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘आरएसपीबी’ला भारतातही असे सर्वेक्षण करावे, अशी सूचना केली़ त्यानुसार ‘बीएनएचएस’ने भुसावळ तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे ठरविले़ येथील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ़ दुधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ़ दुधे यांनी हतूनर जलाशयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली़ संस्थेच्या सदस्यांना सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षणही दिले़ महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, अकोला, पालघर, नाशिक, वाशिम, कोल्हापूर, पुणे आणि वर्धा जिल्ह्यांत ‘बीएनएचएस’च्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे.