१५७ कोटीचे आरोप निश्चित

By Admin | Updated: June 29, 2015 23:37 IST2015-06-29T23:37:47+5:302015-06-29T23:37:47+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँक : दोन दिवसात ८९ जणांना नोटिसा शक्य

157 crore charges fixed | १५७ कोटीचे आरोप निश्चित

१५७ कोटीचे आरोप निश्चित

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी माजी संचालक, अधिकाऱ्यांसह मृतांच्या वारसांवरील आरोप निश्चित केले असून, लवकरच संबंधितांना याप्रकरणी नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. आरोपपत्र ठेवण्यात येणार असल्याने, यात अडकलेल्या दिग्गज नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दोन वर्षापूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुनावणी झाली. या सुनावणीला माजी संचालकांनी आक्षेप घेत सहकारमंत्र्यांसमोर अपील केले होते. तत्कालीन सहकार मंत्र्यांसमोर चारवेळा सुनावणी होऊनही त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सहकार मंत्र्यांकडील अपिलावर तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जानेवारी २०१५ मध्ये याविषयीची सुनावणी घेऊन कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग खुला करण्यात आला होता.
याप्रकरणी १०२ माजी संचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. दरम्यान, यातील काही संचालकांनी म्हणणे मांडताना, संबंधित गैरव्यवहार झाला त्यावेळी आपण संचालकच नसल्याचे स्पष्ट केले होते. संबंधित गैरव्यवहार प्रकरणात सरसकट सर्वच माजी संचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यामुळे संबंधित १४ माजी संचालकांनी याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी प्रकरणांची छाननी केली. १५७ कोटीचा गैरव्यवहार २00७ पूर्वी झालेला असल्याने त्यानंतरच्या कालावधीतील संचालकांना त्यांनी वगळले.
उर्वरित ८९ माजी संचालक व अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यात आल्याचे समजते. आरोप निश्चित झालेल्या माजी संचालक, तत्कालीन अधिकारी व मृत माजी संचालकांच्या वारसांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. या प्रकरणात जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे दिग्गज नेते अडकले आहेत. कारवाईची टांगती तलवार आता त्यांच्यावर लटकत आहे. (प्रतिनिधी)

कर्ज प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे
निनाईदेवी ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेला दिलेल्या १३ कोटी ४४ लाखाचे कर्जप्रकरण तसेच निनाईदेवी साखर कारखान्याला दिलेले ३४ कोटी ७४ लाखाचे कर्जप्रकरण १७ माजी संचालकांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी गंभीर ताशेरे ओढले होते. विलासराव शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते याप्रकरणी अडकण्याची शक्यता आहे.
कर्जवाटप केलेल्या अनेक संस्था सध्या बंद आहेत. वसंतदादा घराण्यातील नेत्यांकडे ताब्यात असलेल्या अनेक संस्थांनाही कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाचे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे अशा अनेक नियमबाह्य गोष्टीतून माजी संचालकांची सुटका होणे कठीण दिसत आहे.

यांच्या अडचणी वाढणार...
मदन पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, राजेंद्रअण्णा देशमुख, विजय सगरे, प्रा. शिकंदर जमादार, बी. के. पाटील, दिनकरदादा पाटील या माजी संचालकांच्या अडचणी गैरव्यवहार प्रकरणामुळे वाढल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या कारवाईकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
घोटाळ्यातून वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिलीप वग्याणी, रणधीर नाईक, उषादेवी चरापले, शंकरदादा पाटील, डी. के. पाटील, राजाराम महादेव पाटील, जयवंतराव कडू-पाटील, राजश्री देशमुख, शशिकांत देठे, विद्यमान संचालक महेंद्र लाड, संग्राम देशमुख, तसेच मृत माजी संचालक सुनील चव्हाण यांचा समावेश आहे.

असा झाला घोटाळा...
निनाईदेवी ऊस तोडणी व वाहतूक संस्था - १३ कोटी ४४ लाख २१ हजार
माणगंगा ऊस तोडणी व वाहतूक संस्था- ७ कोटी ९९ लाख १४ हजार
यशवंत ऊस तोडणी व वाहतूक संस्था - ३५ कोटी ६ लाख ६ हजार
निनाईदेवी साखर कारखाना, नागेवाडी- ३४ कोटी ७४ लाख ४0 हजार
राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना- ५ कोटी ८६ लाख ५५ हजार
पार्श्वनाथ ट्रान्स्पोर्ट कंपनी, सांगली - ८ लाख ७५ हजार
वसंत बझार - २ कोटी ९९ लाख ९३ हजार
महाराष्ट्र विद्युत उपउत्पादक संस्था - ७ कोटी ९२ लाख ८८ हजार
प्रकाश को-आॅप. अ‍ॅग्रो सोसायटी - १२ कोटी १ लाख ६८ हजार
सद्गुरू नागरी सहकारी पतसंस्था, नेर्ले - १४ लाख ९१ हजार
नेर्ले सोया फूडस्, नेर्ले - ३ कोटी ५ लाख ९५ हजार
वसंतदादा साखर कारखाना सेवक पतसंस्था - ८७ लाख ८३ हजार
यशवंत कारखाना सेवक पतसंस्था - ९२ लाख ५१ हजार
महाकंटेनर्स प्रा. लि., कुपवाड- ६ कोटी ४ लाख ७0 हजार
महाराष्ट्र कॅप्सूल कारखाना, बोरगाव- २८ लाख १६ हजार
वसंतदादा शाबू प्रकल्प, रामानंदनगर- ३ कोटी १५ लाख ८५ हजार
जरंडेश्वर साखर कारखाना (सातारा)- १ कोटी ४९ लाख १0 हजार
वसंतदादा सहकारी सूतगिरणी - ४ कोटी ४१ लाख २0 हजार
वसंतदादा सूतगिरणी सेवक पतसंस्था - ४४ लाख ३२ हजार
महायुनी ड्रम्स प्रा. लि., कुपवाड - १ कोटी १२ लाख २७ हजार
एकूण - १५0 कोटी ११ लाख ५१ हजार
एकरकमी परतफेड योजनेतून नुकसान - ७ कोटी ९ लाख २९ हजार

Web Title: 157 crore charges fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.