स्वामी विवेकानंदांवरील १५१ चित्रांचा सकंल्प
By Admin | Updated: January 13, 2015 00:22 IST2015-01-12T21:52:47+5:302015-01-13T00:22:09+5:30
ऐंशी वर्षांच्या ओतारी आर्इंचा तरूणांपुढे आदर्श

स्वामी विवेकानंदांवरील १५१ चित्रांचा सकंल्प
ज्या वयात हातात काठी येते, त्या वयात ब्रश घेतला आणि शरीर साथ देत नसतानाही एक दोन नव्हे; तर स्वामी विवेकानंदांच्या ‘योध्दा संन्यासी’ या चित्रमालेचा जन्म झाला. विविध भावमुद्रा, भव्य पेंटिग्ज, प्रदर्शनात ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या चित्रांचा समावेश. जीवाभावाचे नाते जपलेल्या शारदा माँ, रामकृष्ण परमहंस यांच्या पुतळ्यांमधून मिळालेला आनंद काही वेगळाच. चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, मुंबई, ठाणे या साऱ्या ठिकाणी विवेकानंदांच्या संदर्भात जे जे पाहता आले, ऐकता आले, अनुभवता आले, विविध भाषांमधील साहित्य मिळाले ते वाचले आणि त्यातूनच एक चित्रकथा जन्माला आली. ती म्हणजे ‘योध्दा संन्यासी’.--संवाद
आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेकडे वळले आणि पाहता, पाहता स्वामीमय झाले. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना धीराने तोंड दिले व त्यातूनच जीवनाचा खरा अर्थ उमगला. वयाच्या ६५व्या वर्षी ब्रश हातात घेतला आणि गेल्या पंधरा वर्षांत स्वामी विवेकानंदांची शंभरपेक्षा अधिक चित्रं काढली. ध्यान एकाग्र व्हायला लावतं. मन, बुध्दी व शरीर या तिन्ही पातळ्यांवर समरस झाल्यानेच ‘योध्दा संन्यासी’ या शीर्षकाखाली विवेकनंदांचे जीवन रेखाटता आले. स्वामी विवेकानंद हे जगाचे गुरू, ज्यांनी विश्वव्यापक धर्माचे अधिष्ठान दिले. भारतीय संस्कृतीचा महान इतिहास समोर आणला आणि जगाला शिकवला, त्यांना सतत स्मरणात ठेवूनच माझा चित्रांचा प्रवास सुरू झाला.
साताऱ्याच्या आर्ट स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर, त्यात आपण काही करू शकू, असा विश्वास वाटला नव्हता. मात्र, माहेरचे संस्कार चिपळूणला सासरी आल्यानंतर जपले. पती गजानन ओतारी हे उत्तम व्यायामपटू, मल्लखांबपटू, शिकारी व ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. चिपळूणच्या क्रीडा परंपरेशी त्यांचा सतत संपर्क, सहभाग असायचा. अशा परिस्थितीत आपण या कलेकडे वळू शकू, असा विचार माझ्या मनाला शिवलाही नव्हता. मात्र, स्वामी विवेकानंदांच्या योगसाधनेवर अभ्यास करणारे गुरू अविनाश देवनाळकर यांच्याशी संपर्क आला. माझ्या आजारपणाचे निमित्त झाले. बसणे, उठणे, चालणे या क्रीया अवघड बनल्या असताना, देवनाळकर यांनी प्रेरणा दिली आणि तेथेच मला गुण आला. जेथे बसायला अवघड होते, तेथे आपण तासंतास बसून, उभे राहून चित्र काढू याची कल्पनाही नव्हती. मात्र, प्रत्यक्षात स्वामींचे विचार ऐकून मी प्रेरीत झाले आणि तेथून स्वामी विवेकांनदांची एकामागून एक भव्य पेंटिंग्ज तयार झाली.
या चित्रामागचा इतिहास...
प्रथम स्वामी विवेकानंद, त्यासोबतच रामकृष्ण परमहंस, शारदा मॉ यांची पेंटिंग्ज काढली. चित्र तयार होत होती. आजारपण, थकवा, सांधेदुखी असा प्रवास सुरूच राहिला, तरी ज्या ज्या वेळी मी स्वामींचा विचार करत असे, त्या त्या वेळी मला पुन्हा प्रेरणा मिळत असे व त्यातून संकल्प तयार झाला. स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या चित्राचे कौतुक झाले. चिपळुणातील प्रथितयश चित्रकारांनी पाहिल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी लावावे, अशी सूचना केली. रवींद्र धुरी यांच्यासारख्या नावाजलेल्या पेंटरनी ते सभागृहात लावावे, असे ठरले.
संकल्पामागे काही कारण होते का? असे विचारता, त्यांनी स्वामी विवेकानंद हे जगाला स्फूर्ती देणारे व हिंदू संस्कृती जगात नेऊन पोहोचविणारे असल्याने असा विचार देणारे व्यक्तिमत्व साऱ्यांसमोर उभे राहावे, तरूण पिढीने हा अभ्युदय निर्माण करावा व त्यातून आपले मनोबल वाढवावे, या हेतूने स्वामी माझ्या समोर सतत येत राहिले. केवळ त्यांच्याच स्फूर्तीने मी स्वामींचे वाङमय वाचून काढले. त्यातूनच विवेकानंदांचे शिकागोमधील प्रसिध्द भाषण, शारदा माँशी झालेला संवाद, अमेरिकेत असताना उभे ठाकलेले प्रसंग, रामकृष्णांबरोबरील संवाद, स्वामींचा भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग, प्रतिभा, व्यक्तिमत्त्व या साऱ्याचा माझ्या चित्रांमध्ये मी समावेश केला. त्यातूनच सुमारे पाच वर्षांच्या अभ्यासानंतर स्वामींची चित्रकथा तयार झाली व पाहता पाहता सुमारे ११५ भव्य पेंटिंग्ज तयार झाली.
अनंत अडचणी व आयुष्याचा उत्तरार्ध सुरू असताना हा संकल्प पूर्ण होताना अजूनही अडचणी येतीलच, हे गृहीत धरून यासाठी गेली पंधरा वर्षे मिळेल त्या वेळेचा उपयोग करीत, ही जीवनमाला चित्रातून गुंफत गेले. येत्या काही काळात सुमारे १५१ चित्रांचा संकल्प सत्यात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खडतर काळ, कुटुंबात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देत, स्वामी विवेकानंद यांची पेंटिंग्ज तयार केली. अनेक ठिकाणी सत्कार झाले. चिपळूणमधील विवेकानंद केंद्र (बाजारपुलाजवळ) येथे स्वामींचे चित्रप्रदर्शन भरले. त्यावेळी मान्यवरांनी कोकणातील विवेकानंद केंद्राच्या संकल्प स्थळाबाबत मते स्पष्ट केली होती. ज्यांनी जीवनाला दिशा दिली, त्यांचे यथोचित स्मारक, कलादालन येथे उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याला भरभरून साथ मिळत आहे. आता या कामाला गती देणार आहे.
कन्याकुमारी येथे गेल्यानंतर काय अनुभव आले, हे सांगताना ओतारी आई यांनी विवेकानंद शिला सुमारे साडेपाच तास पाहात होते, अनुभवत होते. विश्वाला स्फूर्ती देणाऱ्या विवेकानंदांच्या विचारधारेशी अधिकाधिक समाज जोडला जावा, यासाठी पुढील काळ घालवणार आहे. विवेकानंदांच्या विचारधारेमध्ये समाजाला एकत्र आणण्याची ताकद आहे. त्यासाठीच विवेकानंदांच्या विचारांशी कोणत्याही भाषेत जवळ जाण्याचा प्रयत्न आपण केला. चित्रांची भाषा हा त्याचाच एक भाग आहे.
सेवाभाव, मदतकार्य, उपासना, ध्यानधारणा केंद्र व तरूणांना या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. सहभाग व मंडळांमध्ये अग्रेसर असलेल्या आईना प्रतीक्षा आहे संकल्प सिध्दीची. तो लवकरच पूर्णत्त्वाला जाईल.
- धनंजय काळे
कोकणात विवेकानंदांचे विचार शिरोधार्ह मानून कार्य करणाऱ्या संस्था आहेत. मी, मुलगी, उद्योजक संगीता ओतारी यांच्यासह या क्षेत्रात काम करणाऱ्या साऱ्यांना भेटून विवेकानंद मठाची कल्पना मांडली आहे. वालोपे ( चिपळूण) येथे या केंद्राचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी स्वामींचे विचार, स्वामींच्या जीवनातील प्रसंग, त्यांची ऐतिहासिक भाषणे, तरूणांना स्फूर्ती देणारे उपक्रम राबवण्याचा विचार असल्याचे ओतारी आई यांनी सांगितले. जहांगिरमध्ये स्वामींच्या भव्य पेंटिंग्जला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय ठरला.