हेक्सवर्ल्ड प्रकरणात १५० तक्रारी
By Admin | Updated: August 11, 2015 01:33 IST2015-08-11T01:33:49+5:302015-08-11T01:33:49+5:30
तळोजा येथील हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या १५० ग्राहकांनी अद्यापपर्यंत पोलिसांशी संपर्क साधला आहे. एकूण २३४४ ग्राहकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात

हेक्सवर्ल्ड प्रकरणात १५० तक्रारी
नवी मुंबई : तळोजा येथील हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या १५० ग्राहकांनी अद्यापपर्यंत पोलिसांशी संपर्क साधला आहे. एकूण २३४४ ग्राहकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात कोट्यवधीचा अपहार झाला असून या प्रकरणात तक्रारदारांच्या दिरंगाईमुळे पोलिसांना दोषारोपपत्र तयार करण्यास विलंब होत आहे.
ग्राहकांकडून पैसे घेवून वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याने तळोजा येथील देविशा इन्फ्रास्ट्रक्चरमार्फत होणारा हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्प वादात आला आहे. या प्रकल्पात घर घेण्यासाठी २३४४ ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. परंतु २००९ पासून सुरु असलेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा अशी मागणी करूनही ग्राहकांना दाद मिळाली नाही. त्यामुळे झालेल्या फसवणुकीची तक्रार ग्राहकांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर व मुलगा पंकज यांच्यासह राजेश धारप, सत्यन केसरकर व अमित बलराज या पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्णाचा तपास गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग करत आहे. त्यांनी २५ एकर जागेच्या या प्रकल्पासाठी २३४४ ग्राहकांकडून बुकिंगसाठी ४४ कोटी ४ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी अवघे १५० ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला.
मागील आठवड्यापर्यंत अवघ्या ७५ ते ८० ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या आवाहनामुळे त्यात भर पडून तक्रारदारांचा आकडा दुप्पट झाला आहे. परंतु २३४४ ग्राहकांपैकी १५० तक्रारदार पुढे आले आहे. प्रकल्पाचे धागेदोरे थेट राजकारण्यांशी जोडले गेल्यानेही अनेक जण तक्रारीसाठी पुढे येत नसल्याची शक्यता आहे. परंतु या प्रकरणातील अधिकाधिक तक्रारदार समोर येतील अशी पोलिसांना आशा आहे. (प्रतिनिधी)