कठोर अटींनंतरही मुंबईत डान्सबारसाठी १५० अर्ज
By Admin | Updated: December 30, 2015 03:52 IST2015-12-30T03:52:49+5:302015-12-30T03:52:49+5:30
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविली असली तरी मुंबईत एवढ्यात तरी पुन्हा ‘छमछम’ सुरू होईल, असे दिसत नाही. मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी १५० अर्ज आले असले

कठोर अटींनंतरही मुंबईत डान्सबारसाठी १५० अर्ज
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविली असली तरी मुंबईत एवढ्यात तरी पुन्हा ‘छमछम’ सुरू होईल, असे दिसत नाही. मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी १५० अर्ज आले असले, तरी अद्याप एकालाही परवाना मिळालेला नाही.
‘प्राप्त अर्जांपैकी २० अर्ज रद्द करण्यात आले असून, ७० अर्जांची छाननी सुरू आहे. उर्वरित ६० अर्जदारांना ‘डान्सबार’साठीच्या २६ अटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. तथापि, एकही अर्जदार अटींच्या पूर्ततेसह पुढे आलेला नाही,’ असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
‘आम्ही डान्सबारसाठी २६ अटी घातलेल्या आहेत. अर्जदाराने तो या अटींच्या पूर्ततेस सक्षम आहे का, याचा स्वत: आढावा घेऊन, तसे लेखी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही निरीक्षकामार्फत लेखा परीक्षण करून संबंधितास परवाना देणार आहोत. अद्याप अटींच्या पूर्ततेसह एकही अर्जदार पुढे आलेला नाही,’ असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले होते.
‘कोणत्या कारणांमुळे तुम्ही अर्ज नामंजूर केले, असे विचारले असता ते म्हणाले की, वेगवेगळी कारणे आहेत. काही अर्ज अशा व्यक्तींच्या नावे होते, ज्यांच्याकडे यापूर्वी परवाना होता. मात्र, ती व्यक्ती आता हयात नाही. काही प्रकरणांत बार ज्या सोसायटीत आहे, तेथील रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे हे अर्ज रद्द करण्यात आले. आम्ही ७० अर्जांची छाननी करत आहोत. अटींची पूर्तता करण्यास अर्जदारांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत अटींची पूर्तता न केल्यास त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे,’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.