नाशिकमध्ये दीड लाख क्विंटल कांद्याचा साठा
By Admin | Updated: August 23, 2015 00:33 IST2015-08-23T00:33:35+5:302015-08-23T00:33:35+5:30
व्यापाऱ्यांनी साठा करुन कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, निबंधक व बाजार समितीच्या सचिवांनी

नाशिकमध्ये दीड लाख क्विंटल कांद्याचा साठा
नाशिक : व्यापाऱ्यांनी साठा करुन कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, निबंधक व बाजार समितीच्या सचिवांनी संयुक्तपणे कांदा साठ्याची माहिती घेतली. जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडे सुमारे दीड लाख क्विंटल कांदा विविध गोदामात साठविल्याचे आढळले.
राज्य सरकारने शुक्रवारीच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन कांदा साठ्याची माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी सर्व तहसीलदारांना शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येक बाजार समितीत नोंदणीकृत असलेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या साठवणूक केंद्रावर जाऊन साठ्याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते.
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुके वगळता अन्य आठ तालुक्यांमध्ये तहसीलदार, तालुका निबंधक व बाजार समितीच्या सचिवांमार्फत सकाळपासून व्यापाऱ्यांच्या गोदामांवर जाऊन माहिती घेण्यात आली. त्यात निफाड तालुक्यात सर्वाधिक कांद्याची साठवण आढळून आली.
निफाडला ६१ हजार २८८ क्व्ािंटल व त्याखालोखाल बागलाण तालुक्यात २४ हजार ३५५ क्किंटल कांदा साठा असल्याचे आढळले. येवला - १५,०३४, मालेगाव - ३,७०३, कळवण - ८,७३८, सिन्नर - ६,४९०, देवळा - १५,१५० व चांदवड - ३,४५९ क्विंटल, असा एकूण एक लाख, ३८ हजार २१७ क्विंटल कांद्याचा साठा आढळल्याची माहिती पुरवठा खात्याने दिली. (प्रतिनिधी)
कांद्याच्या भाववाढीवर निर्यात मूल्यवाढीची मलमपट्टी
मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात मोठी घट झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या कडाडलेल्या भावाने केंद्र सरकारची चिंता वाढविली आहे. निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन २७५ डॉलरने वाढवून ७०० डॉलर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढण्यासाठी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन ४२५ डॉलरवरून ७०० डॉलर करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने १० हजार टन कांदा आयात करण्याचे ठरविले असून २७ आॅगस्टला त्याच्या निविदा उघडल्या जाणार आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर ५५ रुपयांच्या वर गेले असून किरकोळ बाजारात तर कांदा ८० रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. २६ जूनला केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य प्रति क्विंटल २५० डॉलरवरुन ४२५ डॉलर केले होते. मात्र त्यानंतरही कांद्याचे दर नियंत्रणात आलेले नाहीत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव २४ आॅगस्टला नाफेड व कृषी व्यापाराशी संबंधित इतर सरकारी संस्थांकडून कांद्याच्या साठ्याचा आढावा घेणार आहेत. २०१३-१४ मध्ये १९४.०२ लाख टन उत्पन्नाच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये कांद्याचे उत्पादन ४.७९ लाख टनाने घसरून १८९.२३ लाख टन झाले आहे. तर गेल्या वर्षीच्या १३.५८ लाख टन निर्यातीच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये घसरण होऊन ती १०.८६ लाख टन झाली आहे.