विक्री कर विभागाच्या उद्दिष्टात दीड कोटींची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:50 IST2017-04-25T00:50:51+5:302017-04-25T00:50:51+5:30
अकोला : विक्री कराच्या माध्यमातून महसूल गोळा करण्यात नेहमी अव्वल राहणाऱ्या अकोला विक्री कर विभाग २०१६-१७ चे २२६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मागे पडला आहे.

विक्री कर विभागाच्या उद्दिष्टात दीड कोटींची तूट
२२६ कोटींचे उद्दिष्ट अपूर्ण : पुढील आर्थिक वर्षात ‘जीएसटी’चे लक्ष्य
अकोला : अमरावती विभागात, विक्री कराच्या माध्यमातून महसूल गोळा करण्यात नेहमी अव्वल राहणाऱ्या अकोला विक्री कर विभाग २०१६-१७ चे २२६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मागे पडला आहे. अकोला विक्री कर विभागाला दीड कोटींची तूट पडली असून, २२४.३१ कोटींचा महसूलच या विभागाला गोळा करता आल्याची आकडेवारी समोर आली आहे.
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील विभागात दरवर्षी अकोला विक्री कर कार्यालय कर वसुलीत आघाडीवर असते. अकोल्यातील अनेक उद्योग, निमशासकीय संस्था, कार्पोरेट कंपन्यांची संख्या कमी-अधिक होत असली, तरी अकोल्याने आघाडीची पत कायम ठेवली होती. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात १८७ कोटींचा कर अकोला विक्रीकर विभागाने वसूल केल्यानंतर अकोल्यास पुन्हा उद्दिष्ट वाढवून दिले गेले. २०१६-१७ साठी २२६ कोटींचे उद्दिष्ट अकोला विक्री कर विभागाला मिळाले होते. दरम्यान, जीएसटी लागू होत असल्याने अधिकाऱ्यांचा बहुतांश वेळ हा कार्यशाळा आणि त्याच्याशी संबंधित कामकाजात गेला. ऐन फेब्रुवारी-मार्च महिन्यात विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांना उसंत मिळाली नाही. त्यामुळे अकोला विक्रीकर विभागाचे कर्मचारी मागे पडलेत.
आगामी जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीवर आता विक्री कर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. कारण यापुढे व्हॅट आणि विक्री करातील इतर बाबी इतिहासजमा होणार आहेत. केंद्र आणि राज्याच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कायदा लागू होत असल्याने राज्य आणि विभागाच्या उद्दिष्टांचा विषय इतिहासजमा होणार आहे.
पुढील वर्षात विक्री कर विभागाला पीटीशिवाय दुसरे कोणतेही उद्दिष्ट राहणार नाही. दिलेल्या उद्दिष्टांपैकी तीन कोटींची तूट नोंदविली गेली असली, तरी तांत्रिकदृष्ट्या ती तूट नाही. आॅनलाइन कर भरणा प्रक्रियेमुळे काही महसूल हा नंतर गोळा झालेला दिसतो. एप्रिल महिन्याच्या शेवटी आकडेवारीत बदल दिसून येईल. त्यामुळे ही तूट दिसणार नाही.
-सुरेश शेंडगे, विक्रीकर उपायुक्त, अकोला.