१४०० संसारात पुन्हा फुलले हास्य, महिला सुरक्षा कक्षाचा उपक्रम
By Admin | Updated: August 20, 2016 19:46 IST2016-08-20T19:46:02+5:302016-08-20T19:46:02+5:30
किरकोळ कारणावरुन अनेक संसार उध्वस्त होत असताना त्यांना पुन्हा जोडण्याचे काम महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आहे. गेल्या ३ वर्षांत तुटलेले तब्बल १४०१ जोडप्यांचे संसार पुन्हा जोडले.

१४०० संसारात पुन्हा फुलले हास्य, महिला सुरक्षा कक्षाचा उपक्रम
>अमित सोमवंशी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २० - किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये भांडण, तंटे होऊन अनेकांचा संसार उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तव्य आहे. अशा संसाराला जोडण्याचे काम पोलीस आयुक्त कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आहे. मागील तीन वर्षांत तुटलेले तब्बल १४०१ जोडप्यांचे संसार पुन्हा नव्याने जोडले आहेत.
गैरसमज, व्यक्तिगत आणि किरकोळ कारणावरून होणारी कुरबूर घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण जाते. तर काहींना न्यायालयात जावे लागते. यामुळे नवरा-बायको यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. लहान-मोठ्या कारणांमधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभावाने वाढत जातात. विस्कटलेले संसार पुन्हा जोडण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या केंद्रात जानेवारी २०१४ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत एकूण २०६० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात १४०१ जणांच्या संसाराची घडी बसविण्यात पोलिसांना यश आले आहे. तर तडजोड न झालेले व आपापल्या निर्णयावर ठाम असलेल्या काही जोडप्यांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात आल्याचे महिला तक्रार निवारण केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. महिलांवर होणा-या अत्याचारांचे समूळ उच्चाटन करून पती-पत्नीमधील वाद मिटविण्याचे काम कक्षाकडून होत आहे.
१४०१ कुटुंबांना सावरले
महिला तक्रार निवारण केंद्राकडे आलेल्या अर्जावर चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षांना बोलावून त्यांची समजूत काढली जाते. संसार सावरण्यापेक्षा कुटुंब उद्ध्वस्त करणाºया गोष्टी घरात घडू नयेत, अशी समज देऊन पती-पत्नीचे वाद मिटवण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण यशस्वी झाले आहे. मागील तीन वर्र्षांत १ हजार ४०१ संसार उद्ध्वस्त होण्यापासून बचावले आहेत.
सात महिन्यांत ४९६ अर्ज
पोलीस आयुक्त कार्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाकडे अवघ्या आठ महिन्यांत ४९६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३०९ जोडप्यांचे पुन्हा संसार जोडण्यात आले. महिला तक्रार निवारण केंद्राकडे तडजोडीसाठी २०१४ या वर्षात ७५२ अर्ज आले, २०१५ मध्ये ८१२, २०१६ च्या आठ महिन्यांत ४९६ अर्ज आले आहेत.